
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर उलथापालथ पाहायला मिळत आहे. दक्षिण अफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यात 14वा सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा बांगलादेशच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 गडी गमवून 232 धावा केल्या. यासह दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 233 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान गाठताना दक्षिण अफ्रिकेचा डाव गडगडला होता. मात्र नादिन डी क्लर्क येथेही संकटमोचक ठरली. मधल्या फळीत दक्षिण अफ्रिकेचा डाव सावरला. तिने 29 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 37 धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेने 49.3 षटकात 7 गडी आणि 3 चेंडू राखून हा सामना जिंकला. या विजयासह वर्ल्डकप गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. दक्षिण अफ्रिकेच्या विजयामुळे भारताला फटका बसला आहे. कारण भारताची गुणतालिकेत एका क्रमांकाने घसरण झाली आहे. भारतीय संघ तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानी घसरला आहे. तर दक्षिण अफ्रिका तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे.
दक्षिण अफ्रिका आणि बांग्लादेश सामना होण्यापूर्वी भारतीय संघ 4 गुण आणि +0.682 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानी होता. तर दक्षिण अफ्रिका संघ 4 गुण आणि -0.888 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी होता. आता दक्षिण अफ्रिकेला तिसऱ्या विजयासह दोन गुण मिळाले आहेत. त्यामुळे भारतीय संघाला मागे टाकत तिसरं स्थान पटकावलं आहे. दक्षिण अफ्रिकेचे 6 गुण असून नेट रनरेट काही अंशी सुधारला आहे. दक्षिण अफ्रिकेचा नेट रनरेट हा -0.618 आहे. रनरेटच्या बाबतीत भारत अजूनही दक्षिण अफ्रिकेच्या पुढे आहे. पण भारताची पुढची वाट अजून बिकट झाली आहे. कारण टॉप 4 संघ उपांत्य फेरी गाठणार आहे.
बांग्लादेश या स्पर्धेत एकूण चार सामने खेळली. पण तीन सामन्यात पराभव झाल्याने आता पुढची वाट बिकट झाली आहे. बांगलादेशला आता उर्वरित तीन पैकी तीन सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. अन्यथा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. बांगलादेशची कर्णधार निगर सुल्ताना म्हणाली की, ‘न्यूझीलंडच्या सामन्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने पुनरागमन केले ते खूपच उत्तम होते. आम्ही जे केले आहे त्याचा अभिमान वाटतो. आमचे अजून तीन सामने बाकी आहेत.आम्ही आमची बाजू वरचढच ठेवली पाहिजे आणि ते करत राहिले पाहिजे ‘