Womens World Cup : दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना कुठे गमावला? ऋचा घोषने सांगितलं काय चुकलं ते

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील भारतीय संघाला पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण अफ्रिकेने भारताला 3 गडी राखून पराभूत केलं. या पराभवाची काही कारणं सांगितली जात आहेत. या बाबत ऋचा घोषने आपलं मत व्यक्त केलं आहे.

Womens World Cup : दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना कुठे गमावला? ऋचा घोषने सांगितलं काय चुकलं ते
दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना कुठे गमावला? ऋचा घोषने सांगितलं काय चुकलं ते
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Oct 10, 2025 | 6:37 PM

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेतील दहाव्या सामन्यात भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारताचा 3 गडी राखून पराभव केला. खरं तर हा सामना एक क्षण भारताच्या पारड्यात झुकला होता. मात्र नॅडिन डी क्लार्कने विजयाचा घास भारताच्या घशातून खेचून आणला. त्यामुळे भारताचं सलग तीन सामने जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. हातातला सामना गमावल्याने क्रीडाप्रेमी आश्चर्य व्यक्त करत आहेत. कारण पुढे जाऊन उपांत्य फेरीचं गणित आणखी किचकट होणार आहे. भारताचे या स्पर्धेत आता चार सामने शिल्लक आहेत. त्यापैकी तीन सामने आता काहीही करून जिंकावे लागणार आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेशशी लढत होणार आहे. हा प्रवास काही भारतीय संघासाठी वाटतो तितका सोपा नाही. त्यामुळेच हातातला सामना गमावल्याचं दु:ख होत आहे. या पराभवानंतर विकेटकीपर फलंदाज ऋचा घोषने कारण मीमांसा केली. तसेच सामना कुठे फिरला ते सांगितलं.

ऋचा घोष म्हणाली की, ‘नॅडिन डी क्लार्कने क्रांतीच्या षटकात एक षटकार आणि चौकार मारला. त्यापूर्वी, आमचे सामन्यावर पूर्णपणे आमच्या नियंत्रणात होता. आम्ही या पराभवाचा आढावा घेऊ आणि त्याचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आमच्या पुढील सामन्यावर परिणाम होणार नाही.’ दुसरीकडे, या स्पर्धेतल्या सलग तिसऱ्या सामन्यात भारताची टॉप बॅटिंग ऑर्डर फेल गेली. , भारताने 153 धावांवर सात विकेट गमावले होते. त्यामुळे भारताच्या टॉप ऑर्डरला असलेल्या फलंदाजांच्या खेळीबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. ऋचा घोषने आठव्या क्रमांकावर उतरत 94 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला 251 धावांपर्यंत मजल मारता आली. असं असताना ऋचा घोषने याबाबतही आपलं म्हणणं स्पष्ट केलं आहे.

ऋचा घोष म्हणाली की, “आमच्या टॉप ऑर्डरमधील सर्व खेळाडू चांगले फलंदाज आहेत. आम्ही एका सामन्यावरून त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करू शकत नाही. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. प्रत्येक वेळी आमचे सर्वोत्तम देणे हे आमचे काम आहे. तुम्ही नेहमीच टॉप-ऑर्डरला दोष देऊ शकत नाही. आम्ही सामन्यात कधीही हार मानली नाही. आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत खेळलो आणि शक्य तितक्या धावा करण्याचा प्रयत्न केला.” आता भारताचा पुढचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताने हा सामना गमावला तर पुढची वाट खूपच बिकट होणार आहे. त्यामुळे या सामन्यात काहीही विजय मिळवावा लागणार आहे.