Sania Mirza ची IPL मध्ये एंट्री, RCB ला चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी
. सानिया मिर्झा क्रिकेटच्या मैदानात काय करणार?. सानिया मिर्झा क्रिकेट खेळणार नसली, तरी तिच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. सानिया मिर्झा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी काम करणार आहे.

Sania mirza in RCB : भारताची स्टार टेनिसटपूट सानिया मिर्झा लवकरच आपल्याला क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. तुम्ही म्हणाल टेनिस आणि क्रिकेटचा काय संबंध?. सानिया मिर्झा क्रिकेटच्या मैदानात काय करणार?. सानिया मिर्झा क्रिकेट खेळणार नसली, तरी तिच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. सानिया मिर्झा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी काम करणार आहे. लवकरच आयपीएलच्या धर्तीवर वुमन्स प्रीमियर लीग टुर्नामेंट सुरु होणार आहे. या टुर्नामेंटमध्ये RCB ची महिला टीम सुद्धा आहे. सानिया RCB च्या महिला टीमची मेंटॉर म्हणजे मार्गदर्शक आहे. RCB ने त्यांच्या अधिकृत टि्वटर अकाऊंटवरुन ही माहिती दिलीय.
RCB ने टि्वटमध्ये काय म्हटलय?
“सानिया मिर्झा भारतीय क्रीडा क्षेत्रात महिलांसाठी एक आदर्श आहे. तिने तिच्या करिअरमध्ये एक ठरलेली चौकट मोडली. इतरांसाठी आदर्शवत ठरेल असं काम केलं. मैदानावर आणि मैदानाबाहेर ती चॅम्पियन आहे. RCB च्या महिला क्रिकेट टीमसाठी मार्गदर्शक म्हणून सानियाच नाव जाहीर करताना आम्हाला अभिमान वाटतोय” असं आरसीबीने म्हटलय.
सानिया काय शिकवणार?
“मला थोडं आश्चर्य वाटलं. पण मी उत्साहित आहे. मी मागच्या 20 वर्षांपासून व्यावसायिक खेळाडू आहे. क्रीडा क्षेत्रात सुद्धा तुम्ही करिअर घडवू शकता हा विश्वास तरुण महिला, मुलींमध्ये निर्माण करण्याची माझी पुढची जबाबदारी आहे” असं सानिया नियुक्तीनंतर म्हणाली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी तू काय करणार? या प्रश्नावर, कुठल्याही खेळामध्ये दबाव कसा हाताळायचा ते महत्त्वाच असतं. मानसिक दृष्ट्या खेळाडूंना कणखर बनवण्यावर काम करणार असल्याचं तिने सांगितलं.
तोच खरा चॅम्पियन
“क्रिकेट आणि टेनिसच्या खेळात बऱ्याच बाबतीत समानता आहे. प्रत्येक खेळाडू बऱ्याचदा सारखा विचार करतो. त्यांना सारखाच दबाव हाताळावा लागतो. दबावाची स्थिती हाताळणं, महत्त्वाच असतं. जे दबाव उत्तमपणे हाताळतात, ते सर्वात मोठे चॅम्पियन ठरतात” असं सानिया मिर्झा म्हणाली.
RCB च्या टीममध्ये या स्टार खेळाडू
13 फेब्रुवारीला WPL साठी ऑक्शन पार पडलं. स्मृती मांधनला आरसीबीने विकत घेतलं. तिच्यासाठी 3.40 कोटी रुपयांची ऐतिहासिक बोली लावली. एलिस पेरी, सोफी डिवाइन, रेणुका सिंह आणि रिचा घोष हे स्टार खेळाडू या टीममध्ये आहेत.