Viral Video: ‘आज एखाद्या मर्दासारखं वाटलं…’, मध्यरात्री काय झालं ज्यामुळे तरुणी असं म्हणाली…, व्हिडीओ व्हायरल
Instagram Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जेथे एक तरुणी म्हणते, 'आज एखाद्या मर्दासारखं वाटलं...', तरुणी असं का म्हणाली? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल... तर जाणून घ्या नेमकं झालं तरी काय...

Instagram Viral Video: रात्री जेव्हा संपूर्ण शहर गाढ झोपेत असतं, तेव्हा एका महिलेसाठी एकटीने घरी जाणं एखाद्या युद्धापेक्षा कमी नसतं. कारण प्रवासात कोणती व्यक्ती कशी भेटेल काहीही सांगता येत नाही. त्यामुळे रात्री प्रवास करताना महिलांच्या मनात कायम एक भीती असते. रात्री प्रवासात भीती वाटत असल्याने महिला कायम गुगल मॅप पाहात राहतात, तर नातेवाईकांसोबत फोनवर बोलण्याचं खोटं नाटक करत असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिलांची सुरक्षा आणि समाजाच्या कटू सत्याचा वेगळाच चेहरा पाहायला मिळाला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ मुंबईतील आहे. अपूर्वा नावाची एक मुलगी रात्री 2 वाजता मुंबई विमानतळावर उतरली. एवढ्या रात्री मुंबई सारख्या शहरात विमानतळावरून घरी कसं जायचं, याचा विचार करूनच भीती वाटते. मनात सुरक्षेविषयी नेहमीच एक धाकधूक असते. पण घरी सुखरुप पोहोचण्यासाठी अपूर्वाने महिला ड्रायव्हर असलेली कॅब बुक केली आणि प्रवासात कोणताही गोंधळ किंवा दुर्घटना घडली नाही. प्रवास अगदी सामान्य आणि शांत होता आणि हीच सर्वात मोठी गोष्ट ठरली. या एका राईडने अपूर्वाच्या मनातील सर्व भीती दूर केली.
View this post on Instagram
रात्री 2 वाजता केलेल्या प्रवासानंतर तिच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत अपूर्वा म्हणाली, ‘आज एका मर्दासारखं वाटलं… ‘, तिच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अपुर्वाने सांगितल्यानुसार, या कॅब राईडचा अनुभव इतर दिवसांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. कॅब योग्य मार्गाने जात आहे की नाही हे पाहण्यासाठी तिला वारंवार फोनमध्ये गुगल मॅप तपासावा लागला नाही. कोणीतरी आपलं लोकेशन पाहत आहे हे दाखवण्यासाठी तिला खोट्या कॉलचं नाटकही करावं लागलं नाही. यावेळी ती कोणत्याही भीतीशिवाय आणि तणावाशिवाय आरामात सीटवर बसून प्रवासाचा आनंद घेऊ शकली.
सोशल मीडियावर चर्चा सुरू
अपूर्वाचा हा व्हिडिओ येताच सोशल मीडियावर तो व्हायरल झाला. यावर हजारो लोकांची मते समोर आली. आजच्या काळात एका महिलेसाठी भीतीशिवाय जगणे ही सुद्धा एक सुविधा बनली आहे, याबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केलं. कोणत्याही भीतीशिवाय फिरणं आणि सुरक्षित प्रवास करणं हा प्रत्येक मुलीचा अधिकार असला पाहिजे, अशी लोकांची भूमिका आहे.
