
World Test Championship 2025-27 Points Table: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाची विजयाची मालिका अखेर खंडीत झाली आहे. ऑस्ट्रेलियाने सलग सहा कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. मात्र मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 4 गडी राखून 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात कसोटी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे हा सामना फक्त दोन दिवसातच संपला. या पराभवामुळे गुणातलिकेत उलथापालथ झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयी टक्केवारीवर याचा परिणाम झाला आहे. तर इंग्लंडलाही या विजयामुळे फार काही फायदा झालेला नाही. या विजयानंतर इंग्लंडची विजयी टक्केवारी 27.08 वरून 35.19 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. पण गुणतालिकेत अजूनही सातव्या स्थानावर आहे. इंग्लंडने आतापर्यंत खेळलेल्या 9 पैकी फक्त तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाच सामन्यात पराभव आणि एक सामना बरोबरीत सुटला आहे.
ऑस्ट्रेलियाला या पराभवामुळे मोठा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा गुणतालिकेत पहिलं स्थान कायम आहे. पण या पराभवामुळे विजयी टक्केवारीत मात्र घट झाली आहे. सलग सहा सामने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही 100 होती होती. पण आता झालेल्या पराभवानंतर विजयी टक्केवारी 85.71 टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयी टक्केवारी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. त्यांची विजयी टक्केवारी 77.78 आहे. तर दक्षिण अफ्रिकेने चार पैकी 3 सामने जिंकत तिसरं स्थान पटकावलं आहे.
श्रीलंकेने आतापर्यंत दोन सामने खेळले असून एका सामन्यात विजय आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. श्रीलंकेची विजयी टक्केवारी 66.67 टक्के असून चौथ्या स्थानी आहे. तर पाकिस्तानने एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी ही 50 असून पाचव्या स्थानावर आहे. भारतीय संघ सहाव्या स्थानावर आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धची मालिका गमावल्याने भारताला फटका बसला आहे. भारताने 9 सामने खेळले. त्यात चार सामन्यात विजय आणि चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. तर एक सामना ड्रा झाल्याने विजयी टक्केवारी 48.15 आहे.
बांगलादेशचा संघ आठव्या स्थानी असून दोन पैकी एक सामना गमवला आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी 16.67 टक्के आहे. वेस्ट इंडिज शेवटच्या स्थानी असून 8 पैकी सात सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. तर एक सामना ड्रॉ झाल्याने विजयी टक्केवारी 4.17 टक्के असून शेवटच्या स्थानी आहे.