SA vs AUS : कगिसो रबाडाचा धमाका, कांगारुंना झटपट 2 झटके, दक्षिण आफ्रिकेची कडक सुरुवात
South Africa vs Australia Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स गतविजेता ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेने बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. ऑस्ट्रेलिया लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये पहिल्या डावात किती धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरते? याकडे चाहत्याचं लक्ष असणार आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025 फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे लंडनमधील लॉर्ड्समध्ये करण्यात आलं आहे. टेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करत आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे कर्णधारपदाची धुरा आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार 3 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन टेम्बा बावुमा याने फिल्डिंगचा निर्णय घेत कांगारुंना बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात किती धावा करते? तसेच दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज कांगारुंना किती धावांपर्यंत रोखण्यात यशस्वी ठरतात? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
या महाअंतिम सामन्यासाठी गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने प्लेइंग इलेव्हनची घोषणा 1 दिवसआधीच केली होती. त्यामुळे अंतिम सामन्यात कोण खेळणार आणि कोण नाही? हे चित्र स्पष्ट झालं होतं. त्यामुळे दोन्ही संघ पूर्ण तयारीने मैदानात उतरले आहेत. कोणत्या खेळाडू विरुद्ध कोणत्या रणनितीनुसार खेळ करायचा? हे दोन्ही संघांचं निश्चित झालंय. त्यामुळे या डावपेचात कोण यशस्वी ठरतं? हे येत्या काही तासांमध्येच स्पष्ट होईल.
कगिसो रबाडाचा धमाका, कांगारुंना झटपट 2 झटके
वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने झटपट 2 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला कडक सुरुवात करुन दिली. ऑस्ट्रेलियाने 7 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावल्या. रबाडाने उस्मान ख्वाजा याला भोपळाही फोडू दिला नाही. तर कॅमरुन ग्रीन याला 4 रन्सवर आऊट केलं. त्यामुळे ऑस्टेलियाची 7 ओव्हरमध्ये 16 रन्स 2 आऊट अशी स्थिती झाली.
हेड आणि स्टीव्हन स्मिथवर मदार
दक्षिण आफ्रिकेने झटपट 2 झटके दिल्याने आता ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड आणि अनुभवी स्टीव्हन स्मिथ या जोडीवर मदार असणार आहे. ही जोडी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध किती धावा करते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हेड आणि स्मिथने गेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध शतकी खेळी केली होती. तेव्हा हेडने पहिल्या डावात 163 तर स्मिथने 121 धावांची खेळी केली होती. त्यामुळे आताही या जोडीने अशीच कामगिरी करावी, अशी आशा चाहत्यांना असणार आहे.
ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेवर वरचढ
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ एकूण 101 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेवर वरचढ राहिली आहे. ऑस्ट्रेलियाने 101 पैकी 54 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत निम्मे सामनेही जिंकता आलेले नाहीत. दक्षिण आफ्रिकेने 26 सामने जिंकले आहेत. तर 21 सामने अनिर्णित राहिले आहेत.
