WTC Ranking: इंग्लंडला मालिका विजयानंतर किती फायदा? श्रीलंकेला नुकसान, पॉइंट्स टेबलची स्थिती काय?
WTC 2023 Points Table: इंग्लंडने श्रीलंकेवर सलग दुसरा विजय मिळवत कसोटी मालिका जिंकली. या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप रँकिंग आणि पॉइंट्स टेबलमध्ये किती बदल झालाय? जाणून घ्या.

इंग्लंडने श्रीलंकेवर दुसऱ्या कसोटी सामन्यात 190 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. इंग्लंडने या विजयासह 3 सामन्यांची मालिकाही जिंकली. इंग्लंडने या मालिकेत आता 2-0 अशा फरकाने आघाडी घेतली. जो रुट आणि गस एटकीन्सन ही जोडी इंग्लंडच्या विजयाची शिल्पकार ठरली. जो रुटने दोन्ही डावात शतक ठोकलं. तर गसने ऑलराउंड कामगिरी केली. इंग्लंडला या सलग दुसऱ्या विजयाचा चांगला फायदा झाला. इंग्लंडच्या खात्यात आता 81 wtc पॉइंट्स झाले आहेत. तसेच इंग्लंडची विजयी टक्केवारी ही 45 इतकी आहेत. इंग्लंड या क्रमवारीत चौथ्या स्थानी पोहचली आहे. तर श्रीलंकेला पराभवामुळे फटका बसला आहे. श्रीलंकेच्या विजयी टक्केवारीत 7.67 इतकी घट झाली आहे. श्रीलंकेच विजयी टक्केवारी ही 33.33 इतकी झाली आहे. श्रीलंका आता सातव्या स्थानी फेकली गेली आहे.
टीम इंडिया नंबर 1
डब्ल्यूटीसी अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप रँकिंगमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानी कायम आहे. टीम इंडियाने 2023-2025 या साखळीत आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. टीम इंडियाने 9 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 2 वेळा पराभवाचा सामना करावा लागलाय. तर एक मॅच ड्रॉ राहिली. टीम इंडियाच्या खात्यात 74 पॉइंट्स आहेत. तर विजयी टक्केवारी ही 68.52 इतकी आहे.
टीम इंडियानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने 12 पैकी 8 सामने जिंकले आहेत. कांगारुंनी 3 सामने गमावले आहेत. तर टीम इंडियाप्रमाणे 1 मॅच ड्रॉ करण्यात त्यांना यश आलंय. न्यूझीलंड तिसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडची कामगिरी ही 50-50 अशी राहिली आहे. न्यूझीलंडने 6 पैकी 3 सामने जिंकलेत तर तितकेच गमावलेत. इंग्लंडने 15 पैकी 8 सामन्यात विजय मिळवलाय. त्यांना 6 सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. तर एक सामना अनिर्णित राहिला. इंग्लंड चौथ्या स्थानी आहे. इंग्लंडकडे 81 पॉइंट आहेत. तर विजयी टक्केवारी ही 45 इतकी आहे.
दरम्यान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पॉइंट्समध्ये फार अंतर आहे. मात्र त्यानंतरही न्यूझीलंड इंग्लंडपेक्षा पुढे आहे. रँकिंग ही विजयी टक्केवारीनुसार निश्चित केली जाते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप साखळीतील एका विजयासाठी 12 गुण मिळतात. सामना ड्रॉ राहिल्यास 4 तर टाय झाल्यास 6 गुण मिळतात.
