
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत यशस्वी जयस्वालची संघात निवड झाली होती. पण प्लेइंग 11 मध्ये काही जागा मिळाली नाही. ओपनिंगला शुबमन गिल आणि रोहित शर्मा ही जोडी फिक्स असल्याने तिन्ही सामने बेंचवर बसून बघण्याची वेळ आली. पण कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वाल खेळणार हे निश्चित आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी तयारी करण्यासाठी यशस्वी जयस्वालने मोठा निर्णय घेतला आहे. डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वाल आता रणजी ट्रॉफीत मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. मुंबईचा पुढचा रणजी सामनमा 1 नोव्हेंबरला राजस्थानविरुद्ध आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना यशस्वीला दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी वॉर्मअप म्हणून महत्त्वाचा ठरणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वालची बॅट चांगलीच तळपली होती. या मालिकेत त्याने सर्वाधिक धवा केल्या होत्या. त्याने दोन्ही कसोटी मालिकेत मिळून 219 धावांची खेळी केली होती. यशस्वी जयस्वालने दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावत 175 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र दक्षिण अफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गतविजेता आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. अशा स्थितीत सावधपणे खेळणं गरजेचं आहे. त्यात पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत 1-1 ने रोखलं आहे.
यशस्वी जयस्वाल मुंबई संघाकडू मैदानात उतरला तर प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढेल. आयुष म्हात्रे पुढच्या सामन्यात खेळणार नाही. कारण भारत ए संघात त्याची निवड झाली आहे. दक्षिण अफ्रिका ए विरुद्ध खेळण्यासाठी बंगळुरुला जाणार आहे. अशा स्थितीत यशस्वीला ओपनिंगला पाठवून मुंबईची ताकद वाढणार आहे. दरम्यान, यशस्वी जयस्वालने मुंबईचा संघ सोडण्याची तयारी केली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याला एनओसीदेखील दिली होती. मात्र अचानक त्याने निर्णय बदलला आणि मुंबईकडून खेळण्याचं निश्चित केलं. त्या वादानंतर यशस्वी जयस्वाल पहिल्यांदाच मुंबईकडून रणजी ट्रॉफी खेळताना दिसणार आहे.