वाघ अजून थकला नाही! 6, 6, 6, 6, 6, 6… युवराज सिंगनं मैदान गाजवलं; तुफानी खेळीतून ‘सिक्सर किंग’नं ऑस्ट्रेलियाला नमवलं
IND vs AUS Yuvraj Singh News: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्समध्ये इंडियन चॅम्पियन्स आणि ऑस्ट्रेलियन चॅम्पियन्स यांच्यात सामना खेळला गेला. इंडियन चॅम्पियन्सने हा सामना ४६ धावांनी जिंकला.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स २०२६ च्या पहिल्या सामन्यात युवराज सिंगच्या धमाकेदार अर्धशतक आणि मोहित शर्मा तसेच धवल कुलकर्णी यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा ४६ धावांनी पराभव केला. भारताने विजयासह आपल्या स्पर्धेची सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने आपल्या पहिल्या डावात २० षटकांत ७ गडी गमावून १९६ धावा केल्या आणि १९७ धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाने १६.२ षटकांत १५० धावा करून प्रत्युत्तर दिले. परंतु त्यांना ४६ धावांनी पराभव पत्करावा लागला. युवराज सिंगला त्याच्या अर्धशतकासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात धवलने ४ षटकांत ४४ धावा देऊन ४ बळी घेतले, तर मोहित शर्माने ३ षटकांत ३२ धावा देऊन ३ बळी घेतले.
या सामन्यात पियुष चावलाने २ बळी घेतले, तर हरभजन सिंगला एक यश मिळाले आणि भारताच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर कांगारू संघ विजयासाठी आवश्यक धावसंख्या गाठू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून डार्सी शॉर्टने शानदार फलंदाजी करत २८ चेंडूंमध्ये ६५ धावा केल्या, तर जो बर्न्सने ४५ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त संघातील इतर कोणताही फलंदाज विशेष कामगिरी करू शकला नाही.
युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४४ चेंडूंमध्ये ७१ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ६ षटकार आणि ५ चौकार मारले, त्याचा स्ट्राईक रेट १६१.३६ होता. नमन ओझा आणि अंबाती रायडू यांनी भारतासाठी डावाची सुरुवात केली. पण नमनने ३१ तर अंबाती रायडूने ४ धावा केल्यामुळे ही कामगिरी निराशाजनक ठरली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या स्टुअर्ट बिन्नीने बाद होण्यापूर्वी ९ चेंडूंमध्ये १३ धावा केल्या.
युसूफ पठाणने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली फलंदाजी करत २० चेंडूंमध्ये ४ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने १८५.०० च्या स्ट्राईक रेटने ३७ धावा केल्या. इरफान पठाणची बॅट चांगली चालली नाही आणि तो एका धावेवर बाद झाला. तर ऋषी धवनने आपल्या खेळीत ४ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने १२ चेंडूंमध्ये नाबाद ३५ धावा केल्या. या सामन्यात त्याचा स्ट्राईक रेट २९१.६७ होता. ऑस्ट्रेलियाकडून बेन हिल्फेनहॉस, बेन लॉफलिन आणि फवाद अहमद यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.