ZIM vs IND: टीम इंडियाचा विजयी चौकार, झिंबाब्वेवर 42 धावांनी मात, 4-1 ने मालिका खिशात
Zimbabwe vs India 5th T20i Match Result: टीम इंडियाने झिंबाब्वे विरुद्ध सलग चौथा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली आहे.

टीम इंडियाने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झिंबाब्वेवर पाचव्या आणि शेवटच्या टी 20I सामन्यात 42 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने झिंबाब्वेला विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र झिंबाब्वेला भारतीय गोलंदाजांसमोर 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने झिंबाब्वेला 18.3 ओव्हरमध्ये 125 धावांवर ऑलआऊट केलं. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली आहे. झिंबाब्वेने मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभूत करत विजयी सलामी दिली होती. मात्र त्यानंतर टीम इंडियाने जोरदार कमबॅक करत विजयी चौकार लगावला. झिंबाब्वेकडून डिओन मायर्स याने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. तर टीम इंडियाकडून मुकेश कुमार याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
झिंबाब्वेची बॅटिंग
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 168 धावांचा पाठलाग करायला आलेल्या झिंबाब्वेला ठराविक झटके दिले. त्यामुळे झिंबाब्वेच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. झिंबाब्वेसाठी डिओन मायर्सने 32 बॉलमध्ये 4 चौकार आणि 1 सिक्ससह 34 रन्स केल्या. फराज अक्रम आणि तादिवानाशे मारुमणी या दोघांनी प्रत्येकी 27 धावांचं योगदान दिलं. तर ब्रायन बेनेटने 10 धावा केल्या. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियाकडून मुकेश कुमारने 3.3 ओव्हरमध्ये 22 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. शिवम दुबेने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर आणि अभिषेक शर्मा या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी टीम इंडियाने पहिल्या डावात 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 167 धावा केल्या. टीम इंडियासाठी संजू सॅमसन याने सर्वाधिक 58 धावांची खेळी केली.अखेरच्या क्षणी शिवम दुबे आणि रियान पराग या दोघांनी 26 आणि 22 धावा केल्या. तर रिंकु सिंह, यशस्वी जयस्वाल, कॅप्टन शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या चौघांनी अनुक्रमे 11*, 12,13 आणि 14 धावा केल्या. झिंबाब्वेकडून ब्लेसिंग मुझाराबानी याने 2 विकेट्स मिळवल्या. तर सिकंदर रझा, रिचर्ड नगारावा आणि ब्रँडन मावुता या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाचा मालिका विजय
A 42-run victory in the 5th & Final T20I 🙌
With that win, #TeamIndia complete a 4⃣-1⃣ series win in Zimbabwe 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/TZH0TNJcBQ#ZIMvIND pic.twitter.com/oJpasyhcTJ
— BCCI (@BCCI) July 14, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रियान पराग, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे आणि मुकेश कुमार.
झिम्बाब्वे प्लेइंग ईलेव्हन : सिकंदर रझा (कर्णधार), वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), ब्रँडन मावुता, रिचर्ड नगारावा आणि ब्लेसिंग मुझाराबानी.
