
पाथुम निसांका याने पाकिस्तानमध्ये आयोजित टी 20 ट्राय सीरिजमधील पाचव्या सामन्यात झिंबाब्वे विरुद्ध विजयी खेळी केली. पाथुमने रावलपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये 147 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. पाथुमने नाबाद 98 धावा करत श्रीलंकेला पहिला विजय मिळवून दिला. पाथुमने 58 बॉलमध्ये नॉट आऊट 98 रन्स केल्या. पाथुमचं शतक अवघ्या 2 धावांनी अधुरं राहिलं. मात्र पाथुमची एक चुकी त्याचं शतक न होण्यामागील प्रमुख कारण ठरलं. पाथुमने जोरदार फटका मारला. त्यामुळे पाथुम शतकापासून दूर राहिला. नक्की काय झालं? हे सविस्तर जाणून घेऊयात.
बॅटिंग करताना प्रत्येक फलंदाजाचा षटकार-चौकार मारण्याचा प्रयत्न असतो. मात्र पाथुम निसांका यांचं शतक अधुर राहण्यामागे षटकार कारणीभूत आहे. पाथुम 92 धावांवर खेळत होता, तेव्हा श्रीलंकेला 6 धावांची गरज होती. पाथुमने अशात 2 चौकार लगावले असते तरीही त्याचं शतक पूर्ण झालं असतं. मात्र तसं झालं नाही.
पाथुमने 17 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर मोठा फटका मारला. पाथुमने मारलेला फटका थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. पाथुमला अशाप्रकारे 6 धावा मिळाल्या. श्रीलंकेचा यासह विजय झाला. मात्र पाथुमला आपलं शतक अधुरं राहिल्याचं जाणवलं. त्यामुळे पाथुम हसू लागला. पाथुमच्या चेहऱ्यावरील हावभावावरुन त्याला चौकार मारायचा होता, हे जाणवत होतं. मात्र पाथुमचा अंदाज चुकला. त्यामुळे फोरऐवजी सिक्स लागला.
झिंबाब्वेने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये 20 ओव्हरमध्ये 146 धावा केल्या. झिंबाब्वेसाठी तिघांनी 30 पेक्षा अधिक धावा जोडल्या. सलामीवीर ब्रायन बेनेट याने 34 धावा जोडल्या. कॅप्टन सिकंदर रजा याने 37 रन्स केल्या. तर रायन बर्ल याने नाबाद 37 धावांचं योगदान दिलं. श्रीलंकेकडून महीश तीक्षणा वानिंदु हसरंगा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर दासून शनाका याने 1 विकेट मिळवली.
त्यानंतर पाथुम निसांका याने 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 58 बॉलमध्ये 98 रन्स केल्या. कामिल मिशारा याने 12 धावा केल्या. तर कुसल मेंडीस याने नॉट आऊट 25 रन्स केल्या. श्रीलंकेने या विजयासह झिंबाब्वेच्या गेल्या पराभवाची परतफेड केली. झिंबाब्वेने श्रीलंकेला याच मालिकेत 67 धावांनी पराभूत केलं होतं.