SL vs ZIM : श्रीलंकेकडून पराभवाची परतफेड, झिंबाब्वेचा 9 विकेट्सने धुव्वा, पाकिस्तान विरुद्धचा सामना ठरणार निर्णायक
Sri Lanka vs Zimbabwe T20I Match Result : रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात श्रीलंकेने झिंबाब्वेवर 9 विकेट्सच्या फरकाने विजय मिळवला. या विजयामुळे आता अंतिम फेरीसाठी चुरस वाढली आहे.

श्रीलंका क्रिकेट टीमने पाकिस्तान टी 20I ट्राय सीरिजमधील पाचव्या सामन्यात झिंबाब्वेवर दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीतील आव्हान कायम ठेवलं आहे. श्रीलंकेने या मालिकेतील पहिले आणि सलग 2 सामने गमावले होते. त्यामुळे श्रीलंकेसाठी स्पर्धेत कायम राहण्यासाठी झिंबाब्वे विरुद्धचा सामना करो या मरो असा होता. श्रीलंकेने या सामन्यात एकतर्फी विजय साकारला. तसेच श्रीलंकेने या विजयासह गेल्या पराभवाची परतफेडही केली आहे. त्यामुळे आता श्रीलंकेसाठी पाकिस्तान विरुद्ध होणारा सामना अंतिम फेरीच्या हिशोबाने निर्णायक ठरणार आहे. या सामन्याच्या निकालावर झिंबाब्वेचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
श्रीलंकेचा एकतर्फी विजय
झिंबाब्वेने पाकिस्तानसमोर 147 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेने हे आव्हान 22 बॉलआधी 1 विकेट गमावून पूर्ण केलं. श्रीलंकेने 16.2 ओव्हरमध्ये हे आव्हान पूर्ण करत या मालिकेतील पहिलावहिला विजय साकारला. पाथुम निसांका आणि कामिल मिश्रा या सलामी जोडीने श्रीलंकेला अप्रतिम सुरुवात करुन दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र 59 धावांवर श्रीलंकेला पहिला झटका लागला. कामिल मिश्रा 12 धावांवर आऊट झाला.
पाथुमची विजयी खेळी
त्यानंतर कुसल मेंडीस याने पाथुम निसांका याला चांगली साथ दिली. कुसल आणि पाथुम या जोडीनेच श्रीलंकेला विजयी केलं. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 64 बॉलमध्ये 89 धावांची नाबाद भागीदारी केली. कुसलने 25 बॉलमध्ये 25 रन्स केल्या. तर पाथुम श्रीलंकेच्या विजयाचा हिरो ठरला. पाथुमने 58 बॉलमध्ये नॉट आऊट 98 रन्स केल्या. पाथुमने या खेळीत 4 षटकार आणि 11 चौकार लगावले.
झिंबाब्वेची बॅटिंग
त्याआधी झिंबाब्वेने या क्रिकेट सामन्यात टॉस जिंकून 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 146 धावांपर्यंत मजल मारली. झिंबाब्वेसाठी ओपनर ब्रायन याने 34 धावा केल्या. तर अखेरच्या क्षणी कॅप्टन सिकंदर रझा आणि रायन बर्ल या जोडीने निर्णायक भूमिका बजावली. या दोघांनी प्रत्येकी 37 धावा केल्या. रायनने 26 बॉलमध्ये नॉट आऊट 37 रन्स केल्या. तर रझाने 29 चेंडूत 37 धावा केल्या. श्रीलंकेसाठी वानिंदु हसरंगा आणि महीश तीक्षणा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. श्रीलंकेने यासह झिंबाब्वेचा हिशोब केला. झिंबाब्वेने श्रीलंकेला 20 नोव्हेंबरला 67 धावांनी पराभूत केलं होतं.
साखळी फेरीतील फायनल निर्णायक
दरम्यान साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आमनेसामने असणार आहेत. पाकिस्तान फायनलमध्ये पोहचली आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा सामना औपचारिकता असणार आहे. मात्र श्रीलंका आणि झिंबाब्वेसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. श्रीलंकेने हा सामना जिंकल्यास ते अंतिम फेरीत पोहचतील. मात्र पाकिस्तानने श्रीलंकेला पराभूत केलं तर झिंबाब्वेला फायनलचं तिकीट मिळेल. त्यामुळे या सामन्यनाकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. हा सामना 27 नोव्हेंबरला होणार आहे.
