सुरेश रैनाच्या काका-भावाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, तिघे आरोपी पंजाब पोलिसांच्या अटकेत

| Updated on: Sep 16, 2020 | 5:08 PM

अटक केलेले तीन दरोडेखोर आंतरराज्य टोळीचा भाग असून उर्वरित 11 जणांचा शोध सुरु असल्याचे पंजाब पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी सांगितले

सुरेश रैनाच्या काका-भावाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, तिघे आरोपी पंजाब पोलिसांच्या अटकेत
Follow us on

चंदिगढ : क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या टोळीच्या तीन सदस्यांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या प्रकरणाचा गुंता सोडवण्यात आल्याचे बुधवारी जाहीर केले. पठाणकोटमध्ये गेल्या महिन्यात दरोडेखोरांनी रैनाचे काका आणि आत्येभावाचा जीव घेतला होता. (cricketer Suresh Raina’s kin attack & murder case solved)

अटक केलेले तीन दरोडेखोर हे आंतरराज्य टोळीचा भाग होते. टोळीतील उर्वरित 11 जणांचा शोध सुरु असून त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पंजाबचे पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी सांगितले. पंजाब पोलिसांच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमने 24 संशयितांना पकडले होते. राजस्थानमधील चिरावा, सुलताना आणि आसपासच्या गावांतून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.

त्या रात्री काय झालं?

पाच आरोपी शिडी छतावर चढून सुरेश रैनाच्या आत्याच्या घरात शिरले. तिथे त्यांना तिघे जण मॅटवर पहुडलेले दिसले. घरात जाण्यापूर्वी दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. घरातील रोख आणि सोन्याचे दागिने घेऊन पळून जाण्यापूर्वी त्यांनी आणखी दोघांवर हल्ला केला.

पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात राहणाऱ्या रैनाच्या आत्याच्या कुटुंबावर शुक्रवार 28 ऑगस्टच्या रात्री दरोडेखोरांनी हल्ला केला होता. पठाणकोटमधील माधोपूरजवळील थारियाल गावात राहणाऱ्या अशोक कुमार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर टोळीने हल्ला केला.

58 वर्षीय अशोक कुमार यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला. तर जखमी झालेला आत्तेभाऊ कौशल याचा दोन दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. रैनाची आत्या आशा देवी आणि आत्तेभाऊ अपिन यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर आत्याच्या 80 वर्षीय सासूबाई सत्या देवी यांना लगेचच रुग्णालयातून सोडण्यात आले होते, मात्र त्यांना जबर मानसिक धक्का बसला होता.

“माझ्या कुटुंबासोबत जे झाले ते भयावह होते. माझ्या काकांची हत्या करण्यात आली, माझी आत्या आणि दोघा आत्तेभावांना गंभीर जखमा झाल्या. दुर्दैवाने माझ्या आत्तेभावाचेही निधन झाले. हे घृणास्पद कृत्य कोणी केले, हे आम्हाला समजले पाहिजे. त्या गुन्हेगारांना सोडता कामा नये” असा शब्दात सुरेश रैनाने या घटनेनंतर संताप व्यक्त केला होता. (cricketer Suresh Raina’s kin attack & murder case solved)

दरम्यान, आरोपींच्या अटकेनंतर सुरेश रैनाने आत्याच्या घरी भेट दिली. “पोलिस चांगले काम करत आहेत. आम्हाला मदत केल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

संबंधित बातम्या :

दरोडेखोरांचा हल्ला, क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या काकांचे निधन

काकांपाठोपाठ जखमी भावानेही प्राण सोडले, गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, रैनाचा संताप

(cricketer Suresh Raina’s kin attack & murder case solved)