Harmanpreet Kaur: फक्त तिच्यामुळे भारताला मिळाली Asia Cup ची ट्रॉफी, कर्णधार हरमनप्रीत कौरनं कोणाला दिलं क्रेडिट?
Womens Asia Cup 2026: भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला आशिया कप यांच्यातील फायनल सामना रंगला जो भारतीय संघाने जिंकला. भारतीय संघ चॅम्पियन बनला आणि आशिया कपची ट्रॉफी उंचावली आहे.

IND W vs SL W: महिला आशिया कप २०२६ चा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने श्रीलंकेला ७२ धावांनी पराभूत करून आठव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ५ गडी गमावून १८३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, श्रीलंकेचा संघ २० षटकांत १११ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात श्रीलंकेकडून कर्णधार चमारी अटापट्टूने सर्वाधिक ३६ धावा केल्या. आशिया कप जिंकल्यानंतर आता कर्णधार हरमनप्रीत कौरने एक विधान केले आहे.
हरमनप्रीत कोर म्हणाली की, “आम्हाला माहित आहे की, आम्ही एक उत्कृष्ट संघ आहोत,आणि आम्ही आमच्या दर्जेप्रमाणे खेळलो. आम्ही स्वतःसाठी एक दर्जा ठरवला होता आहेत आणि आम्हाला ते टिकवून ठेवायचे होते. मी प्रत्येकाच्या कामगिरीवर खूप खूश आहे. [धावसंख्येबद्दल] हो, सलामीवीरांनी आमच्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. शफाली आणि स्मृती ज्या पद्धतीने फलंदाजी करत होत्या, ती अप्रतिम होती. संपूर्ण स्पर्धेत शफालीसारख्या खेळाडूला फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत पुढाकार घेताना पाहणे खूप छान वाटले.”
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी १२९ धावांची मोठी भागीदारी करून संघाला दमदार सुरुवात करून दिली. शेफालीने स्फोटक फलंदाजी करत ३९ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा केल्या. त्यानंतर स्मृती मंधाना ३९ चेंडूंमध्ये ५९ धावा (५ चौकार आणि ३ षटकार) करून बाद झाली.
सुरुवातीला दोन्ही फलंदाज ज्या प्रकारे फलंदाजी करत होते, ते पाहून असे वाटत होते की भारत २०० धावांचा टप्पा सहज पार करेल. मात्र, पहिली विकेट पडल्यानंतर भारतीय डाव अचानक अडखळला. संघाने आपल्या पुढच्या चार विकेट्स केवळ ५४ धावांत गमावल्या. रिचा घोषने १७, कर्णधार हरमनप्रीत कौरने १४, तर जी. कमलिनी १५ धावांवर नाबाद राहिली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले, ज्यात मिताली अयोध्या, चमारी अटापट्टू आणि चामुडी प्रबोधा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. इमेशा दुलानी केवळ चार धावांवर बाद झाल्याने संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर चमारी अटापट्टू आणि विष्मी गुणरत्ने यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. अटापट्टू ३२ चेंडूंमध्ये ३६ धावा करून बाद झाली. तिच्या विकेटने श्रीलंकेचा डाव अडखळला. विष्मी गुणरत्नेने २० धावा आणि नीलाक्षी सिल्वाने २२ धावांचे योगदान दिले. संघाला विजय मिळवून देण्यासाठी त्यांचा डाव पुरेसा ठरला नाही. भारतासाठी श्री चरणीने सर्वाधिक चार बळी घेतले.