व्वा! याला म्हणतात स्वाभिमान; आशिया कप जिंकणाऱ्या भारतीय लेकींनी नक्वींची पुरती फजिती केली, ट्रॉफीला दिला नकार
भारताने महिला आशिया चषक 2026 च्या फायनलमध्ये श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव करत आठव्यांदा आशिया चषक जिंकला. त्यानंतर, विजयानंतरच्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता मोठी घडामोड समोर आली आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या महिला आशिया चषक 2026 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला 72 धावांनी धूळ चारत भारतीय संघाने 8 व्यांदा चॅम्पियन बनण्याचा पराक्रम केला. मात्र, या विजयानंतर बक्षीस वितरण सोहळ्यात पुन्हा एकदा मोठा ड्रामा पाहायला मिळाला. एशियन क्रिकेट कौन्सिलचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्या हातून आशिया चषकाची विजेती ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय महिला क्रिकेट संघाने स्पष्ट नकार दिला, ज्यामुळे नक्वी यांना व्यासपीठावर प्रचंड नामुष्कीचा सामना करावा लागला.
हरमनप्रीतच्या संघाचा कडक पवित्रा
भारताने सामना जिंकल्यास मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यावरून वाद निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती. गेल्या वर्षी पुरुष आशिया चषक फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सने हरवल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानेही मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. त्यावेळी भारतीय संघाने ट्रॉफीशिवाय केवळ ‘चॅम्पियन्स’च्या बॅनरसोबत विजयाचा जल्लोष साजरा केला होता. यासर्व प्रकरणाची तेव्हा खूप चर्चा झाली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा तसंच घडलं आहे.
महिला आशिया चषक 2026 च्या फायनलमध्येही हरमनप्रीत कौर आणि तिच्या सहकाऱ्यांनी तोच कडक पवित्रा कायम ठेवला. प्रोटोकॉलनुसार नक्वी यांना मुख्य अतिथी म्हणून विजेतेपद सोपवायचे होते, पण भारतीय संघाच्या ठाम भूमिकेमुळे ते ट्रॉफी सुपूर्द करू शकले नाहीत. सीमेवरील वाढता राजकीय तणाव आणि राष्ट्रीय भावना लक्षात घेऊन भारतीय संघाने ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. या सगळ्या प्रसंगामुळे मैदानावर काही काळ शांतता पसरली होती.
टीम इंडियाचा चाहत्यांसोबत जल्लोष
बक्षीस वितरण सोहळ्यादरम्यान भारतीय संघाने एसीसी अध्यक्ष आणि पाकिस्तानी मंत्र्यांपासून सुरक्षित अंतर ठेवलेले पाहायला मिळाले. अखेर उपविजेत्या श्रीलंकेच्या खेळाडूंना पदके देऊन आणि पुरस्कार जाहीर करून घाईघाईत सोहळा संपवण्यात आला. अधिकृत ट्रॉफी हातात नसली, तरी भारतीय महिला खेळाडूंनी राष्ट्रध्वज हातात घेऊन संपूर्ण मैदानावर फेरी मारली आणि चाहत्यांसोबत आपल्या 8 व्या विजेतेपदाचा शानदार जल्लोष साजरा केला.
