
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद तर जगजाहीर आहे. मात्र आता शमीची पत्नी हसीन जहाँने सोशल मीडियावर पोस्ट करून एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. हसीन जहाँने तिचा पती मोहम्मद शमीवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. तिने शमीबद्दल दावा केला की तो दुसऱ्या महिलेच्या मुलाला मोठ्या शाळेत पाठवतो पण त्याच्या स्वत:च्या मुलीला मात्र त्याने मोठ्या शाळेत प्रवेश घेण्यापासून रोखलं. पण आता तिची लाडकी लेक बेबो एका मोठ्या इंटरनॅशनल शाळेत शिकणार आहे, असं तिने आता सांगितलं आहे. काय म्हणाली हसीन जहाँ, जाणून घेऊया.
हसीन जहाँने दिली खुशखबरी
हसीन जहाँने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहीलं, ‘आज मी अल्लाहमुळे खूप आनंदी आहे. शत्रूंची इच्छा होती की, माझ्या मुलीला चांगल्या शाळेत प्रवेश मिळू नये, पण अल्लाहने त्यांना निराश केले आणि माझ्या मुलीला एका चांगल्या आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश मिळाला. धन्यवाद, अलहमदुलिल्लाह.’ असं लिहीत तिने मुलीचा हसरा फोटो पोस्ट केला आहे.
शमीवर लावला गंभीर आरोप
मात्र याच पोस्टमधून तिने मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले आहेत. त्याने त्याच्या मुलीच्या अभ्यासावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला असं तिने नमूद केलं. हसीन जहाँने असाही आरोप केला की, ‘माझ्या मुलीच्या वडिलांनी (मोहम्मद शमी) माझी मुलगी चांगल्या शाळेत शिकू नये यासाठी खूप प्रयत्न केले, पण वडील म्हणजे काही देव नव्हे. ज्या मुलीचा बाप अब्जाधीश आहे तो दुसऱ्या महिलांमुळे,त्याच्याच स्वत:च्या मुलीच्या जीवाशी खेळत होती. तो दुसऱ्या महिलेच्या मुलांना मोठ्या शाळांमध्ये शिक्षण देतो. काही महिलांना लाखो रुपयांच्या बिझनेस क्लास फ्लाइटमध्ये तो घेऊन जातो पण त्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे देऊ शकत नाही. देवाचे आभार, देशात कायदा आहे, नाहीतर आमचं काय झालं असतं कोणास ठाऊक. ‘ अशी पोस्ट लिहीत तिने शमीवर हल्ला चढवला आहे.
शमी देतो 4 लाख रुपये
टीम इंडियाचा नामवंत गोलंदाज असलेला मोहम्मद शमी हा दरमहा हसीन जहाँला 4 लाख रुपये देतो. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या भत्त्यातून मुलीसाठी 2.5 लाख रुपये आणि हसीन जहाँसाठी 1.5 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहेत. मात्र ही रक्कम खूप मी असल्याचं हसीन जहाँ म्हणाली होती. महागाई खूप वाढत असूनहे पैसे कमी असल्याचं तिचं म्हणणं होतं. हसीन जहाँने दरमहा 10 लाख रुपयांची मागणी केली होती.