T20 World Cup : टी20 वर्ल्डकप पहायचाय ? खिसा होईल खाली; ईडन गार्डन्सच्या तिकीटांचे भाव…

फेब्रुवारीत टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार असून ईडन गार्डन्स येथेही अनेक सामने रंगणार आहेत. ग्रुप स्टे, सुपर-8 आणि सेमीफायनल सारख्या मुख्य मॅचेस होणार असून हे सामने पहायचे असतील तर खिसा रिकामा करण्याची तयारी ठेवा.

T20 World Cup : टी20 वर्ल्डकप पहायचाय ? खिसा होईल खाली; ईडन गार्डन्सच्या तिकीटांचे भाव...
टी-20 वर्ल्डकप
Image Credit source: फाईल फोटो
| Updated on: Dec 18, 2025 | 9:09 AM

ICC पुरुष टी-20 वर्ल्डकप (T-20 worldcup) सुरू होण्यास अवघे काही दिवसच बाकी असून या वर्ल्डकप दरम्यान कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवरही (Eden Gardens) काही मॅचेस होणार आहेत. याच सामन्यांच्या तिकिटांच्या किमती आता जाहीर करण्यात आल्या आहेत. बंगाल क्रिकेट संघाने बुधवारी अधिकृतरित्या वेगवेगळ्या मॅचेससाठी तिकीट दरांची घोषणा केली. विशेष गोष्ट म्हणजे क्रिकेटप्रेमींना 100 रुपयांपासून ते 10 हजार रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये तिकीट मिळणार आहे. म्हणजेच सर्वसामान्य जनतेपासून ते प्रीमिअम प्रेक्षकांपर्यंत, सर्व वर्गांसाठी ऑप्शन्स अव्हेलेबल असतील.

येत्या 7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्डकप ही प्रतिष्ठित स्पर्धा सुरू होणार आहे आणि ईडन गार्डन्सवर पुन्हा एकदा काही मोठे सामने खेळवले जाणार आहेत. ग्रुप स्टेज, सुपर 8 आणि सेमीफायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यांसाठी भिन्न तिकिटांच्या किमती उपलब्ध आहेत.

ग्रुप स्टेजसाठी कसे असतील तिकीटांचे दर ?

बांगलादेश विरुद्ध इटली, इंग्लंड विरुद्ध इटली आणि वेस्ट इंडिज विरुद्ध इटली यासारख्या ग्रुप सामन्यांच्या तिकिटांच्या किमती तुलनेने कमी ठेवण्यात आल्या आहेत. या सामन्यांसाठी प्रीमियम हॉस्पिटॅलिटी (बी प्रीमियम) तिकिटे 4 हजार रुपयांत उपलब्ध असतील. लोअर ब्लॉक्स बी आणि एल साठी 1 हजार रुपयातं तिकीटं मिळतील.

त्याशिवाय लोअर ब्लॉक सी, एफ आणि के ची तिकीटं 200 रुपयांत मिळतील. तसेच लोअर ब्लॉक डी, ई, जी, एच आणि जे यांच्या तिकीटांची किंमतही 200 रुपयेच ठेवण्यात आली आहे. तर अपर ब्लॉक बी1, सी1, डी1, एफ1, जी1, एच1, के1 आणि एल1 यांची तिकीटं अवघ्या 100 रुपयांत विकत घेता येऊ शकतात. यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये मॅच पाहणं सुलभ ठरेल.

मोठ्या सामन्यांसाठी जास्त किंमत

वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश आणि इंग्लंड विरुद्ध बांगलादेश यांसारख्या हाय-प्रोफाइल ग्रुप सामन्यांसाठी तिकिटांच्या किमती थोड्या जास्त आहेत. या सामन्यांसाठी प्रीमियम बी तिकिटांची किंमत 5 हजार रुपये इतकी असेल. लोअर ब्लॉक बी आणि एल साठी तिकिटांची किंमत 1500 हजार रुपये, लोअर ब्लॉक सी, एफ आणि के साठी 1 हजार आणि लोअर ब्लॉक डी, ई, जी, एच आणि जे साठी 500 रुपयांत तिकीट उपलब्ध असेल. अप्पर ब्लॉक तिकिटे 300 रुपयांत मिळतील.

सुपर-8 आणि सेमीफायनल ठरणार सर्वात महागडी

ईडन गार्डन्सवरील सुपर 8 सामन्यांची आणि सेमीफायनलची तिकिटे सर्वात महाग आहेत. प्रीमियम हॉस्पिटॅलिटी तिकिटांची किंमत 10 हजार रुपये इतकी आहे. लोअर ब्लॉक B आणि L साठी तिकिटांची किंमत 3 हजार, C, F आणि K साठी 2500 रुपये आणि D, ​​E, G, H आणि J साठी 1500 रुपयांत तिकीट उपलब्ध असेल. तर अपर ब्लॉकच्या तिकिटांची किंमत 900 रुपये असेल.