
तब्बल एक तप म्हणजे 12 वर्षं टीम इंडियाने घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावली नव्हती, मात्र आता अवघ्या 1वर्षांत, गेल्या 12 महिन्यांत भारतीय संघाला दुसऱ्यांदा पराभवाची चव चाखावी लागली आहे. 2012 ते 2024 या 12 वर्षांत घरच्या मैदानावर फक्त 5-6 सामने गमावलेल्या टीम इंडियाने 2024 मध्ये न्युझीलंडविरुद्धची कसोटी मालिका तर गमावलची पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धही 7 पैकी 5 सामने गमावलेच. सध्याचा कोच गौतम गंभीर याच्या कार्यकाळातच हे सगळं घडलं आहे. त्यामुळेच आता गंभीरच्या कोचिंगबद्दल प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. फक्त गंभीरच नव्हे तर चीफ सिलेक्टर अजीत आगरकर हाही प्रश्नांच्या फैरीत अडकणार आहे. मात्र BCCI अद्याप तरी त्याच्याविरोधात काही कारवाई करण्याच्या मूडमध्ये नाही असं दिसतंय.
इंडियन एक्सप्रेसमधील एका रिपोर्टनुसार, एका वर्षात दोन कसोटी मालिकांमध्ये क्लीन स्वीप होण्याची लाजिरवाणी परिस्थिती ओढवली असूनही भारतीय क्रिकेट बोर्ड सध्या घाईघाईने कोणतीही कारवाई करणार नाही. BCCI मधील सूत्रांच्या हवाल्यान या रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आलं की, बोर्डाकडून तडकाफडकी कोणतंही पाऊल उचललं जाणार नाही, कारण टीम इंडिया सध्या बदलातून जात आहे. बोर्ड सध्या खेळाडूंबाबत कोणतेही बदल करण्याचे आदेश देणार नाही असा दावाही करण्यात आला आहे.
गंभीरच्या नोकरीवर संकट की दिलासा ?
बोर्डाच्या या निर्णयामुळे गौतम गंभीरची नोकरी सध्या सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होतो. तर बोर्डाच्या सूत्राचा हवाला देत जो रिपोर्ट समोर आलाय त्यातून हेच संकेत मिळतात. त्यानुसार, “आम्ही सध्या त्याच्या (गंभीर) बद्दल कोणताही निर्णय घेणार नाही कारण विश्वचषक जवळ आला आहे आणि त्याचा करार देखील 2027 च्या विश्वचषकापर्यंत आहे.” असे नमूद करण्यात आले. जुलै 2024 मध्ये गंभीरलाटीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं आणि त्याला 3 वर्षांचा कार्यकाळ देण्यात आला, जो 2027 च्या वर्ल्डकपच्या अखेरीपर्यंत राहील. मात्र असं असलं तरी या पराभवानंतर बीसीसीआयचे अधिकारी निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाशी नक्कीच बोलतील आणि भविष्यातील योजनांवर चर्चा करतील.
त्यामुळेच आता हे स्पष्ट होतंय की 12 महिन्यांत घरच्या मैदानावर पाच कसोटी सामने गमावले असले तरी, प्रशिक्षक गौतम गंभीर याचे स्थान सध्या धोक्यात नाही, तसेच खेळाडू आणि निवडकर्त्यांचे स्थान देखील सुरक्षित आहे. टीम इंडियाला आता त्यांची पुढची कसोटी मालिका थेट ऑगस्ट 2026 मध्ये खेळायची आहे, जेव्हा ते श्रीलंकेच्या दौऱ्यावर जातील. तर भारतात, मायभूमीत पुढची कसोटी मालिका ही थेट 2027 मध्ये असेल, तेव्हा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येईल. त्यामुळे या फॉर्मॅटसाठी रणनिती आखण्यासाठी गंभीरकडे बराच वेळ आहे.