IND vs AFG : श्रेयसने टॉस जिंकून बॉलिंग घेतली; वैभव सूर्यवंशी आणि ‘या’ दोघांशिवाय मैदानात उतरली टीम इंडिया
IND vs AFG India Playing XI : दिल्लीतील पहिल्या टी-20 सामन्यात टॉसचा कौल भारताच्या बाजूने लागला. श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण अंतिम प्लेइंग 11 समोर येताच वैभव सूर्यवंशीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झदरान यालाही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीच करायची होती. भारतीय संघाने प्लेइंग 11 मध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला या सामन्यात संधी मिळालेली नाही. याशिवाय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि युवा वेगवान गोलंदाज यश ठाकूर यांनाही पहिल्या टी20 सामन्यातून बाहेर राहावे लागले आहे.
भारतीय संघाच्या फलंदाजीची धुरा संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यावर असेल. तर अष्टपैलू म्हणून टिळक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांना संघात स्थान देण्यात आले आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग वेगवान गोलंदाजी सांभाळतील, तर वरुण चक्रवर्तीवर फिरकी गोलंदाजची जबाबदारी असेल.
दोन्ही संघांची प्लेईंग 11
भारत: संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
अफगाणिस्तान: इब्राहिम झदरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), सेदिकुल्लाह अटल, दरविश रसूली, अजमतुल्लाह उमरजई, गुलबदीन नायब, मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी.