ढोंगी लोहपुरूष पत्रकार परिषदेतून फरार, सपकाळ यांची अमित शाहांवर टीका; मुंबई दौऱ्याचा व्हिडीओ केला पोस्ट!
हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या एक्स खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अमित शाह यांचा पत्रकार परिषदेतील व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अमित शाह मला सेवा संकल्प अभियानावरच प्रश्न विचारावेत, अशी विनंती करताना दिसत आहेत.

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या या मुंबई भेटीदरम्यान त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा संकल्प अभियान राबवले जाईल, असे सांगितले. या अभियानाअंतर्गत एका महिन्यात वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातील. दरम्यान, अमित शाह यांनी यावेळी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. घुसखोरी, ईडी कारवाई अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी यावेळी भाष्य केले. दरम्यान, एका प्रश्नाचे उत्तर देताना शाह यांनी आजच्या पत्रकार परिषदेचा मुद्दा हा सेवा संकल्प अभियान आहे. त्यामुळे या मुद्द्यावरूनच प्रश्न विचारावित, असे आवाहन केले. तसेच नंतर पत्रकार परिषद संपवली. हाच धागा पकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शाह यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. त्यांनी शाहा यांचा ‘ढोंगी लोहपुरुष’ असा उल्लेख केलाय. तसेच हे कसले लोहपुरुष असे म्हणत त्यांनी शाह यांना घेरलं.
‘ढोंगी लोहपुरुष’ थेट पत्रकार परिषदेतून फरार
हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या एक्स खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अमित शाह यांचा पत्रकार परिषदेतील व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अमित शाह मला सेवा संकल्प अभियानावरच प्रश्न विचारावेत, अशी विनंती करताना दिसत आहेत. यावर बोलताना ‘महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेतील भ्रष्टाचारावर प्रश्न विचारताच ‘ढोंगी लोहपुरुष’ थेट पत्रकार परिषदेतून फरार झाले. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेतील हजारो कोटींच्या भ्रष्टाचारावर पत्रकाराने थेट प्रश्न विचारताच सहकार मंत्री अमित शहांना घाम फुटला आहे. उत्तरे द्यायची ताकद उरली नाही, म्हणून थेट पत्रकार परिषद गुंडाळून त्यांनी पळ काढला,’ अशी जहरी टीका सपकाळ यांनी केली. तसेच स्वतःच्याच खात्यात चाललेल्या सहकार क्षेत्रातील दरोड्यावर बोलायला तोंडाला कुलूप आणि ज्यांचे पाय थरथरतात ते कसले ‘लोहपुरुष’? असा हल्लाबोलही त्यांनी केलाय.
प्रत्येक घुसखोराला बाहेर काढू
दरम्यान, शाह यांनी एनडीएशासित 21 राज्यांत 2029 सालापर्यंत समान नागरी कायदा लागू करू, असेही शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सोबतच त्यांनी देशातील प्रत्येक घुसखोराला बाहेर काढू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
