रोहितने कोहली-धोनीचे रेकॉर्ड मोडले, IndvsBan सामन्याची नऊ अनोखी वैशिष्ट्यं

| Updated on: Nov 04, 2019 | 8:27 AM

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने आजी आणि माजी या दोन्ही कर्णधारांचा एक-एक विक्रम मोडित काढला. सामन्याची नऊ अनोखी वैशिष्ट्यं पाहायला मिळाली.

रोहितने कोहली-धोनीचे रेकॉर्ड मोडले, IndvsBan सामन्याची नऊ अनोखी वैशिष्ट्यं
Follow us on

नवी दिल्ली : बांगलादेशविरुद्ध दिल्लीत झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाच्या पदरी पराभव आला. बांगलादेशने
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. भारताने दिलेल्या 148 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग बांगलादेशने सात विकेट्स गमावून केला. टी20 मालिकेत बांगलादेशने 1-0 ने आघाडी घेतली असली, तरी सामन्यात कर्णधार रोहित शर्माने आजी आणि माजी या दोन्ही वनडे कर्णधारांचा एक-एक विक्रम मोडित काढला. सामन्याची (IndvsBan T20I Records) नऊ अनोखी वैशिष्ट्यं पाहायला मिळाली.

1. रोहित शर्माने धोनीला मागे टाकलं : टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा हा 99 वा टी20 सामना होता. महेंद्रसिंह धोनी (98 सामने) चा रेकॉर्ड मोडित काढत रोहित भारतासाठी सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा क्रिकेटपटू ठरला आहे.

2. रोहित शर्माच्या सर्वाधिक टी20 धावा : रोहित शर्मा हा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. रोहितने 2 हजार 452 धावा करत विराट कोहली (2 हजार 450) यालाही मागे टाकलं. म्हणजेच एकाच सामन्यात रोहितने टीम इंडियाच्या आजी आणि माजी कर्णधाराचे विक्रम मोडले.

3. सहस्र’सामना’वली : टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हा एक हजरावा सामना होता. पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघादरम्यान खेळण्यात आला होता.

4. पंचाचंही शतक : भारत वि. बांगलादेश सामन्याचे अम्पायर रंजन मधुगले यांचा हा शंभरावा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होता. जेफ क्रो यांनी आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच 119 सामन्यांचं अम्पायरिंग केलं आहे.

5. शिवम दुबेचं पदार्पण : शिवम दुबेला या सामन्यातून भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. भारतासाठी टी20 खेळणारा तो 82 वा खेळाडू आहे. शिवमला पहिल्या सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही, हा भाग अलाहिदा.

6. बांगलादेशच्या सलामीवीराचंही पदार्पण : बांगलादेशचा सलामीवीर मोहम्मद नईम यानेही आपला पहिला सामना खेळला. तो बांगलादेश संघासाठी टी20 खेळणारा तो 67 वा खेळाडू ठरला आहे.

7. बांगलादेशचा पहिला विजय : बांगलादेशने टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतावर सात गडी राखून मात केली. टी20 सामन्यात बांगलादेशने भारतावर मिळवलेला हा पहिला विजय आहे. यापूर्वी सर्व आठ सामन्यात बांगलादेशला भारताकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.

8. मुशफिकूरच्या अर्धशतकांचा षटकार : मुशफिकूर रहीमच्या दमदार खेळीच्या बळावर बांगलादेश संघाचा विजय झाला. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने सहावं अर्धशतक लगावलं. रहीमने साठ धावांची झुंजार खेळी केली.

9. दोन धुरंधरांशिवाय पहिला विजय : ‘प्लेइंग इलेवन’मध्ये शाकिब अल हसन आणि तमीम इक्बाल यांच्याशिवाय बांगलादेशने मिळवलेला हा पहिला टी20 आंतरराष्ट्रीय विजय. या दोघांशिवाय बांगलादेशने गेले तीन सामने गमावले आहेत.

IndvsBan T20I Records