ENG vs IND : बुमराहसोबत अशा ठिकाणी दुर्घटना घडली की…त्यालाच म्हणतात खराब नशीब, टीम इंडियाला मिळाली शिक्षा

ENG vs IND : ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर चौथ्या टेस्ट मॅचमध्ये तिसऱ्यादिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांचा एक-एक विकेट घेण्यासाठी संघर्ष सुरु होता. भारतीय गोलंदाजांची धार बोथट झाल्याचं दिसून आलं. टीम इंडिया इंग्लंडला रोखण्यात कमी पडत असताना दुर्देवाने आणखी एका अडचणीचा सामना करावा लागला.

ENG vs IND : बुमराहसोबत अशा ठिकाणी दुर्घटना घडली की...त्यालाच म्हणतात खराब नशीब, टीम इंडियाला मिळाली शिक्षा
jasprit bumrah
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 26, 2025 | 7:52 AM

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा फिटनेस आणि वर्कलोड मॅनेजमेंट चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे. इंग्लंड विरुद्ध मँचेस्टरमध्ये चौथ्या टेस्ट मॅच दरम्यान टेन्शन थोडं वाढलं आहे. या स्टार गोलंदाजाला सामन्यादरम्यान दुखापत झाली. टेस्ट मॅचच्या तिसऱ्यादिवशी हे सगळं झालं. त्याची शिक्षा टीम इंडियाला मिळाली आहे. इंग्लंडने 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमच्या शिड्या चढताना बुमराहला ही दुखापत झाली. बॉलिंग कोचने हा खुलासा केला.

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर 23 जुलैपासून टेस्ट सीरीजचा चौथा कसोटी सामना सुरु झालाय. कसोटीच्या दुसऱ्यादिवशी टीम इंडियाला गोलंदाजीसाठी उतरावं लागलं. या कसोटीआधी आकाश दीप आणि अर्शदीप सिंह हे दोन भारतीय गोलंदाज दुखापतीमुळे आऊट झाले होते. जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबद्दल संशय होता. पण दोन गोलंदाजांना झालेली दुखापत आणि सीरीज गमावण्याची भिती असल्याने बुमराहला मैदानात उतरवण्यात आलं.

गोलंदाजी कोचने काय खुलासा केला?

बुमराह आपल्या भेदक गोलंदाजीने इंग्लंडच कंबरड मोडेल अशी टीम इंडियाला अपेक्षा होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अन्य गोलंदाजांप्रमाणे बुमराह विशेष काही प्रभावी कामगिरी करु शकला नाही. बुमराहसोबत एक छोटीशी दुर्घटना घडल्यानंतर टीम इंडियाची चिंता वाढली. दिवसाचा खेळ संपल्यानंतर गोलंदाजी कोच मॉर्ने मॉर्कलने त्या बद्दल खुलासा केला. तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान जेव्हा बुमराह ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमच्या ड्रेसिंग रुममधून खाली येत होता, तेव्हा शिड्यांवर त्याचा पाय मुरगळला. त्यामुळे काहीवेळ त्याला खूप वेदना झाल्या. नव्या चेंडूने तो गोलंदाजी करु शकला नाही. मॉर्कलनुसार ही दुखापत जास्त गंभीर नाहीय.

नवीन चेंडू घेतल्यानंतर टीम इंडियाला फटका कुठे बसला?

बुमराहच नाही, मोहम्मद सिराजची सुद्धा फिटनेसशी झुंज सुरु आहे. मॉर्कलने प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये सांगितलं की, “दुसरा दिवस चांगला नव्हता. पण तिसऱ्यादिवशी गोलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा दिसून आली. आम्ही दुसरा नवीन चेंडू घेतला, त्यावेळी दुर्देवाने गोलंदाजांच्या दुखापतीने आमच्या अडचणी वाढवल्या” टीम इंडियाने 90 ओव्हरनंतर नवीन चेंडू घेतला. पण एक ओव्हरनंतरच बुमराह पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर बऱ्याचवेळाने तो गोलंदाजीसाठी आला. सिराजने पाच ओव्हर नव्या चेंडूने गोलंदाजी केली. पण त्याला सुद्धा दुखापतीमुळे ड्रेसिंग रुममध्ये परतावं लागलं.

इंग्लंडच्या 544 धावा

तिसऱ्यादिवसाचा खेळ संपताना इंग्लंडने 7 विकेट गमावून 544 धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या टीमने 135 ओव्हर खेळल्या. यात बुमराहने 28 ओव्हर गोलंदाजी केली. बुमराहला शेवटच्या सेशनमध्ये एक विकेट मिळाला. सिराजला सुद्धा शेवटच्या सत्रात यश मिळालं. अंशुल कंबोज (18 ओव्हर 89 रन्स 1 विकेट) आणि शार्दुल ठाकुर (11 ओव्हर 55 रन्स) पूर्णपणे निष्प्रभावी ठरले.