तो फोटो आणि बरंच काही… आयपीएल राहिलं बाजूला करूण नायरच्या बायकोच्या पोस्टची का होतेय चर्चा?
दिल्ली कॅपिटल्सतर्फे खेळणाऱ्या करुण नायरने आयपीएलमध्ये शानदार पुनरागमन करत 40 बॉल्समध्ये 89 धावा केल्या. त्यानंतर त्याची पत्नी सनायाने एक खास पोस्ट केली आहे. सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे.

भारतीय क्रिकेट संघाकडून खेळलेल्या करुण नायरची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा पण नंतर त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. सतत संघर्ष करत असताना, करुणने एकदा सोशल मीडियावर आपले मन मोकळे केले आणि क्रिकेटमध्ये संधी मिळावी अशी विनंती केली. त्याच पोस्टमुळे त्याचं नशीब बदलले आणि आज संपूर्ण जग त्याच्याबद्दल बोलत आहे. आयपीएल 2025 चा सीझन सध्या खूपच चर्चेत आहे. याचआयपीएलमध्ये करुणच्या शानदार पुनरागमनानंतर त्याची पत्नी सनाया हिनेही एक भावनिक पोस्ट पोस्ट केली असून सध्या सगळीकडे त्याच पोस्टची चर्चा सुरू आहे.
करुण नायरने 13 एप्रिल रोजी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्येजबरदस्त पुनरागमन केले. मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून 40 बॉल्समध्ये 89 धावा केल्या. जेक फ्रेझर-मॅकगर्क लवकर बाद झाल्यानंतर 33 वर्षीय नायरला इम्पॅक्ट सब्स्टीट्युट म्हणून खेळवण्यात आले आणि पण त्याच संधीचे सोनं करत त्याने गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केलं. त्याने अवघ्या 22 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं , जे आयपीएलमधीलत्याचं सर्वाधिक जलद अर्धशतक आहे.
7 वर्षांत नायरचे हे पहिलेच आयपीएल अर्धशतक होतं. यापूर्वी, त्याने 2018साली किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना अर्धशतक झळकावले होते. मात्र 13 तारखेच्या सामन्यात त्याने स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या देखील केली. 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध केलेल्या 83 धावांचा विक्रम त्याने ओलांडला.
त्यानंतर वरूण नायरची पत्नी सनाया टंकारीवाला हिने तिच्या पतीच्या आयपीएल कारकिर्दीचा हृदयस्पर्शी प्रवास इंस्टाग्रामवर शेअर केला. तिने 2017 साली नायर दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळत असतानाचा एक जुना फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये दोघेही हसताना दिसत होते. यासोबतच, तिने 2025 मधील सध्याचा फोटो देखील शेअर केला आहे ज्यामध्ये तो त्याच्या दोन्ही मुलांसह दिल्ली कॅपिटल्सच्या जर्सीमध्ये दिसला. याच फोटोची सगळीकडे चर्चा आहे.