कोल्हापुरातील ‘महाराष्ट्र केसरी’ पदक विजेत्या पैलवानाचा फांदी पडून मृत्यू

| Updated on: Sep 23, 2019 | 10:28 AM

शेतात झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी गेला असताना झालेल्या अपघातात 24 वर्षीय पैलवान विक्रम मोरे याचा झाडाची फांदी कोसळून मृत्यू झाला.

कोल्हापुरातील महाराष्ट्र केसरी पदक विजेत्या पैलवानाचा फांदी पडून मृत्यू
Follow us on

कोल्हापूर : कोल्हापुरातील युवा पैलवान विक्रम मोरे याचा झाडाची फांदी पडून मृत्यू (Kolhapur Wrestler Vikram More Dies) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुमार कामगार केसरी, महाराष्ट्र केसरीमध्ये ब्राँझ पदकाची कमाई करणाऱ्या विक्रमच्या अकस्मात निधनाने कुस्ती विश्वावर शोककळा पसरली आहे. करवीर तालुक्यातील कोगे गावात रविवारी सकाळी ही घटना घडली होती.

विक्रम आपल्या मित्रांसोबत देवस्थान मळीमधल्या शेतात झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी गेला होता. त्यावेळी विक्रम झाडावर चढला, तर त्याचे चौघं मित्र फांदीला दोरी बांधून खाली थांबले होते. यावेळी अचानक झाडाची वरची फांदी तुटली आणि थेट विक्रमच्या अंगावर कोसळली.

झाडावरच विक्रम दोन्ही फांद्यामधल्या खोडात बसलेला असल्याने त्याला हलता आलं नाही. फांदीचा जोरदार फटका बसल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. मित्रांनी घाबरुन त्याला झाडावरुन खाली उतरवलं आणि तात्काळ रुग्णालयात नेलं, मात्र त्याआधीच विक्रमचा मृत्यू (Kolhapur Wrestler Vikram More Dies) झाला होता. शवविच्छेदनानंतर विक्रमचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याचं पार्थिव पाहून कुटुंबीयांनी आक्रोश केला.

WWC: ‘राहुल आवारे’ला कांस्य, जागतिक पदक मिळवणारा पहिला महाराष्ट्रीयन

विक्रमने कुमार कामगार केसरी, पट्टणकोडोली केसरी, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ब्राँझ पदक पटकावलं होतं. पुण्यात झालेल्या महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतही त्याने सुवर्ण पदक मिळवलं होतं.

विक्रम मोरे हा कुंभी कासारी साखर कारखान्याचा तीनवेळा मानधनधारक मल्ल होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण आणि चुलते असा परिवार आहे.

विक्रम मोरेचं नेत्रदान

विक्रमच्या पार्थिवाचं शवविच्छेदन करताना नातेवाईकांनी एकत्र येऊन अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. पण रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अपुऱ्या डॉक्टर उपलब्धतेमुळे नेत्रदान करुन मृतदेह घरी नेण्यात आला. दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही मोरे कुटुंबीयांनी घेतलेल्या नेत्रदानाच्या निर्णयाचं कौतुक होत आहे.