IPL 2020 : धोनीने ठोकलं शतक, ‘असा’ विक्रम करणारा दुसरा खेळाडू

| Updated on: Oct 05, 2020 | 9:25 AM

धोनी एक चांगला फलंदाज आणि एक उत्तम कर्णधार आहेच, परंतु धोनी एक उत्कृष्ट यष्टीरक्षकदेखील (विकेटकिपर) आहे.

IPL 2020 : धोनीने ठोकलं शतक, असा विक्रम करणारा दुसरा खेळाडू
Follow us on

दुबई : चेन्नई सुपरकिंग्सचा (Chennai Superkings) कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात एक नवा विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. या सामन्यात चेन्नईचे सलामीवीर शेन वॉट्सन आणि फॅफ डू प्लेसिसने नाबाद भागीदारी करत चेन्नईच्या संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे धोनीला फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले नाही. तरीदेखील या सामन्यात धोनीने एक विक्रम केला आहे. (MS Dhoni registers 100 catches in the Indian Premier League)

धोनी एक चांगला फलंदाज आणि एक उत्तम कर्णधार आहेच, परंतु धोनी एक उत्कृष्ट यष्टीरक्षकदेखील (विकेटकिपर) आहे. धोनीने कालच्या सामन्यात एक विकेटकिपर म्हणून शतक साजरं केलं आहे. धोनीने आयपीएलमध्ये विकेटकिपर म्हणून 100 किंवा त्यापेक्षा जास्त झेल घेण्याचा विक्रम केला आहे. असा विक्रम करणारा धोनी दुसरा विकेटकिपर ठरला आहे.

दिनेश कार्तिकपाठोपाठ माही दुसऱ्या स्थानी
पंजाबविरुद्धच्या सामन्यात 18 व्या षटकात धोनीने पंजाबचा कर्णधार के. एल. राहुलचा अप्रमतिम झेल घेतला. यावेळी चेन्नईकडून शार्दूल ठाकूर गोलंदाजी करत होता. धोनीने 195 सामन्यात 100 झेल घेतले आहेत. अनेकांना आश्चर्य वाटेल की, धोनीच्याही अगोदर एका दुसऱ्या विकेटकिपरने हा विक्रम केला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार असलेल्या दिनेश कार्तिकने धोनीच्याही अगोदर हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे धोनीपेक्षाही कमी सामने खेळत त्याने या विक्रमाला गवसणी घातली आहे. कार्तिकने 186 सामन्यांमध्ये आतापर्यंत तब्बल 133 झेल घेतले आहेत. यापैकी 30 झेल त्याने एक क्षेत्ररक्षक म्हणून घेतले आहेत, तर उर्वरीत 103 झेल त्याने विकेटकिपर म्हणून घेतले आहेत.

एकूण विकेट्सच्या बाबतीत धोनीच अव्वल

सर्वाधिक झेल कार्तिकच्या नावे असले तरी एक विकेटकिपर म्हणून धोनी दिनेश कार्तिकच्या पुढे आहे. धोनीने 100 झेल आणि 39 स्टम्पिंग (यष्टीचित) असे मिळून 139 विकेट मिळवल्या आहेत. तर कार्तिकने 103 झेल आणि 30 स्टम्पिंग केले आहेत. या दोघांनंतर रॉबिन उथप्पाचा नंबर लागतो. उथप्पाने विकेटकिपर म्हणून 90 विकेट स्वतःच्या नावावर केल्या आहेत.

दरम्यान, काल खेळवण्यात आलेल्या सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जसने (Chennai Super Kings) के. एल. राहुलच्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings Eleven Punjab) 10 विकेट्सने दणदणीत पराभव केला आहे. पंजाबने विजयासाठी दिलेल्या 179 धावांचे आव्हान चेन्नईने एकही विकेट न गमावता पूर्ण केले.

शेन वॉटसन आणि फॅफ डु प्लेसिस या सलामीच्या जोडीने चेन्नईला विजय मिळवून दिला. या जोडीने पंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत अवघ्या 106 चेंडूत नाबाद 181 धावांची धमाकेदार सलामी भागीदारी केली. शेन वॉटसनने 53 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर दुसऱ्या बाजूला फॅफ डु प्लेसिसनेही नाबाद 87 धावा केल्या. त्याने या खेळीत 11 चौकार आणि षटकार लगावला.

संबंधित बातम्या

KXIP vs CSK ​: वॉटसन आणि डू प्लेसिसने रचली IPL इतिहासातील सर्वात मोठी पार्टनरशीप

वय हे काहींसाठी संघाबाहेर काढण्यासाठीचं कारण, इरफान पठाणचा धोनीवर अप्रत्यक्ष हल्ला

MS Dhoni IPL 2020 | मॅच फिनिशर धोनीचा फॉर्म हरवला?, चाहत्यांना हुरहुर

(MS Dhoni registers 100 catches in the Indian Premier League)