
वैभव सूर्यवंशीने अवघ्या 35 चेंडूत शतक ठोकून आयपीएल 2025 मध्ये धमाका केला होता. पण पुढच्याच सामन्यात मुंबई इंडियन्सची टीम या खेळाडूला जमिनीवर घेऊन आली. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने वैभव सूर्यवंशीला खातही उघडू दिलं नाही. अवघ्या 2 चेंडूत त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर दीपक चाहर जे बोलला, ते प्रत्येक क्रिकेट फॅनने जाणून घेणं, समजून घेणं महत्त्वाच आहे. दीपक चाहरने सांगितलं की, तो कुठल्या रणनितीसह गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेला आणि प्रत्येक फलंदाजाची काहीतरी कमकुवत बाजू असते.
दीपक चाहरला जेव्हा वैभव सूर्यवंशीच्या विकेटबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी तो म्हणाला की, “वैभव गुजरात टायटन्स विरुद्ध दमदार इनिंग खेळला होता. पण प्रत्येक खेळाडूचा एक पॅटर्न असतो. तो एखाद्या ठिकाणी मजबूत असेल, तर कुठेतरी कमजोर असणार. एक गोलंदाज म्हणून आम्ही प्रत्येक फलंदाजाविरुद्ध प्लान बनवला” “फक्त वैभवच नाही, राजस्थानच्या प्रत्येक फलंदाजासाठी आमच्याकडे प्लान तयार होता. कधी प्लान चालतो, कधी चालत नाही. यावेळी प्लान काम करुन गेला. आम्ही लकी ठरलो, तुम्हाला माहितीय की, वैभव एक कमालीचा टॅलेंटेड खेळाडू आहे. तो भविष्यात चांगली कामगिरी करेल” असं दीपक चाहर म्हणाला.
वैभव, चाहरच्या जाळ्यात कसा फसला?
वैभव सूर्यवंशीला आऊट करण्यासाठी दीपक चाहरने खूप स्मार्ट रणनिती वापरली. त्याने वैभवला आधी शॉर्ट ऑफ पीच चेंडू टाकला. मग खूप पुढे चेंडू टाकला. सूर्यवंशी फुल लेंग्थ चेंडूवर जास्त जोरात प्रहार करतो. पण चाहरने चेंडू थोडा जास्त पुढे फेकला. परिणामी वैभवचा शॉर्ट फ्लॅट गेला. विल जॅक्सने त्याचा सोपा झेल पकडला. वैभव सूर्यवंशीला त्याच्या पुढच्या सामन्यात या कमकुवत बाजूवर काम करावं लागेल. कारण आयपीएलमध्ये गोलंदाजीचा स्तर हाय आहे. ते लवकर तुमच्या कमकुवत बाजूचा फायदा उचलतात.