IPL 2026 : या टीममध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव सारखे कॅप्टन्स आहेत, ते का..एक मोठा प्लेयर हार्दिक पंड्याच्या बाजूने बोलला

Mumbai Indians IPL 2026 : मुंबई इंडियन्स टीमसाठी आयपीएल 2026 चा सीजन खूप खराब ठरतोय. टीमच्या पराभवाची मालिकाच सुरु आहे. त्यामुळे कॅप्टन आणि टीममधल्या इतर गोष्टींवर प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. आता हार्दिक पंड्याची स्थिती पाहून एका मोठा प्लेयर त्याच्या मदतीला धावला आहे.

IPL 2026 : या टीममध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव सारखे कॅप्टन्स आहेत, ते का..एक मोठा प्लेयर हार्दिक पंड्याच्या बाजूने बोलला
Mumbai Indians
Image Credit source: ipl/bcci
| Updated on: Apr 26, 2026 | 1:01 PM

आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सची टीम शेवटून तिसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत मुंबईचे सात सामने झाले आहेत. त्यात दोन विजय आणि पाच पराभव अशी टीमची कामगिरी आहे. मुंबई इंडियन्सच्या नावावर आयपीएलमध्ये पाच विजेतेपदं आहेत. टॉप टीम्समध्ये समावेश होणार्‍या मुंबई इंडियन्सची अशी कामगिरी पाहून कॅप्टनवर टीका होणं स्वाभाविक आहे. हार्दिक पंड्याच्या बाबतीतही तेच सुरु आहे. चहूबाजूंनी हार्दिक पंड्यावर टीका सुरु आहे. त्यादिवशी मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्सने 103 धावांनी मोठा पराभव केला. संजू सॅमसनने दमदार शतक झळकावलं. त्या बळावर चेन्नईने 6 बाद 207 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून फक्त सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या दोघांनीच दुहेरी आकडा गाठला. हार्दिक शुन्यावर बाद झाला.

या सततच्या पराभवानंतर हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविक आहे. मुंबई इंडियन्सचे माजी कोच रॉबिन सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन हार्दिक पंड्याची बाजू घेतली आहे. एक्सपर्ट्स आणि चाहत्यांना फक्त हार्दिकला दोष देऊ नका असं आवाहन केलं आहे. त्यांच्यामते आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करणारे फलंदाजही लक्ष्याचा पाठलाग करताना चांगलं प्रदर्शन करण्यात अपयशी ठरलेत.

कॅप्टनला दोष देणं चुकीचं वाटतं

“काल रात्री आयपीएलमध्ये सीएसकेकडून MI चा पराभव झाला. त्यानंतर होणाऱ्या टिप्पण्या पाहता आणि काही वर्षांपूर्वी मी त्या मॅनेजमेंटचा भाग होतो, मला वाटतं या दारुण पराभवासाठी फक्त कॅप्टनला दोष देणं चुकीचं वाटतं” अशी रॉबिन सिंह यांनी एक्सवर पोस्ट केलीय. “लक्ष्य समोर असताना अनुभवी आंतरराष्ट्रीय फलंदाजांना काय समस्या येते? त्यांनी रनरेट नियंत्रणात ठेऊ नये का? हीच तर प्रत्येक खेळाडूची भूमिका असते. टॉस जिंकून प्रत्येकवेळी धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय कोण घेतो?” असे सवाल रॉबिन सिंग यांनी विचारले आहेत.

ते का सल्ला देत नाहीत?

“कॅप्टनने काही चुकीचे निर्णय घेतले मान्य, पण या टीममध्ये कितीतरी आंतरराष्ट्रीय कर्णधार आहेत. ते का त्याच्याजवळ जाऊन सल्ला देत नाहीत? कॅप्टनचा खराब सीजन असेल तर सगळ्या टीमला आम्ही सगळे अपयशी ठरतोय हे एक कारण मिळत का? या टीमच्या बाबतीत टीम रुममध्ये बरेच प्लान बनवले जातात” अशा शब्दात रॉबिन सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव सारखे आंतरराष्ट्रीय कॅप्टन्स आहेत. या सिनियर खेळाडूंनी कठिण परिस्थितीत हार्दिकला सल्ला दिला पाहिजे याकडे रॉबिन सिंह यांनी लक्ष वेधलं.

 

Follow Us