FIFA World Cup: कॅनडाने बाद फेरीत रचला इतिहास, दक्षिण अफ्रिकेला नमवत पहिल्यांदाच असं घडलं
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता पुढे सरकत आहे. राउंड ऑफ 32 बाद फेरीचा खेळ सुरू आहे. या फेरीत यजमानपद असलेल्या कॅनडाने इतिहास रचला आहे. कॅनडाने दक्षिण अफ्रिकेला 1-0 पराभूत करत स्पर्धेतून बाहेर काढलं आहे.

Canada vs South Africa FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप स्पर्धेत अनेक घडामोडी पहिल्यांदाच घडत आहेत. त्यामुळे आश्चर्य वाटणं सहाजिकच आहे. साखळी फेरीनंतर राउंड 32 बाद फेरीचे सामने सुरू आहेत. या फेरीत यजमान कॅनडाचा सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध झाला. लॉस एंजिल्स येथे रंगलेल्या या सामन्यात कॅनडाने दक्षिण अफ्रिकेला 1-0 ने मात दिली आणि स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. या विजयासह कॅनडाने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत इतिहास रचला आहे. कॅनडाने पहिल्यांदाच फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या राउंड ऑफ 16 मध्ये स्थान पक्कं केलं आहे. खरं तर कॅनडा आणि दक्षिण अफ्रिका या दोघांसाठी हा सामना महत्त्वाचा होता. कराण यापूर्वी या दोघांनी कधीही बाद फेरीचा सामना खेळला नव्हता. आता कॅनडाने एक पाऊल पुढे टाकलं असून राउंड ऑफ 16 मध्ये खेळणार आहे.
पहिल्या डावात काय झालं?
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील कॅनडा आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिला डाव रोमहर्षक झाला. कारण या डावात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. पण गोल करण्यासाठी जबरदस्त झुंज दिली. खरं तर दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करण्याऐवजी बचावात्मक खेळाला पसंती दिली. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला गोलची पहिली संधी चालून आली. पण गोलकीपर मॅक्सिम क्रॅप्यूने हा गोल अडवला. त्यानंतर कॅनडाने आक्रमक बाणा आत्मसात केला. पहिल्या डावाच्या 43व्या मिनिटाला कॅनडाकडे गोल करण्याची संधी आली. पण दक्षिण अफ्रिकेच्या गोलकीपर रोनवेन विलियम्सने हा गोल अडवला. त्यामुळे पहिला डावा 0-0 ने संपला.
दुसऱ्या डावात काय झालं?
दुसऱ्या डावात गोल कोण मारणार? याची उत्सुकता होती. कारण सामना गोलरहित सुटला असता तर शूटआऊटमध्ये गेला असता. असं असताना दक्षिण अफ्रिकेने आक्रमक आणि गोलसाठी चांगले प्रयत्न केले. पण कॅनडा डिफेन्स भेदण्यात अपयश आलं. त्यानंतर 74व्या मिनिटाला कॅनडाचा स्टार फुटबॉलपटू अल्फांसो डेविड मैदानात उतरला. त्याच्या गतीने कॅनडाच्या फॉरवर्ड लाइनला बळ मिळालं. त्यामुळे दक्षिण अफ्रिकन डिफेन्सवर दबाव वाढला. त्यानंतर कॅनेडियन मिडफिल्डर स्टेफान युस्टाकिओने इतिहास रचला. 92 व्या मिनिटाला युस्टाकिओने अचूक आणि जोरदार शॉट मारून गोल केला. यासह 1-0 आघाडी घेत कॅनडाने विजय मिळवला. कॅनडा ब्राझीलनंतर निर्धारित वेळेत नॉकआऊट सामना जिंकणारा पहिला यजमान देश ठरला. ब्राझीलने 2014 मध्ये अशी कामगिरी केली होती. या ऐतिहासिक विजयासह कॅनडा आता 4 जुलै रोजी ह्यूस्टन येथे होणाऱ्या राऊंड ऑफ 16 मध्ये मोरोक्कोशी सामना करेल.