Anirudh Khanduri : दिल्लीकर अनिरुद्ध खंडुरीच्या मेहनतीला यश, युरोपमध्ये घेणार फुटबॉलचे धडे, दिग्गजांकडून मिळणार मार्गदर्शन
जिद्द आणि मेहनत घेण्याची तयारी असल्यास काहीही शक्य आहे, हे दिल्लीच्या अनिरुद्ध खंडुरी याने दाखवून दिलं आहे. अनिरुद्धची ऑस्ट्रियामधील सर्वोत्तम खेळाडूंसोबत प्रशिक्षण घेण्यासाठी निवड झाली आहे.

भारतात असंख्य प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांच्यातील प्रतिभेला योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते यशाची शिखरं पादक्रांत करु शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. भारतीयांचा क्रिकेटकडे अधिक कळ आहे. क्रिकेटच्या तुलनेत फुटबॉलसारख्या खेळाला फार वाव नाही. त्यामुळे प्रतिभा असूनही अनेक फुटबॉलपटू हे प्रसिद्धीपासून दूर राहतात. असेच प्रतिभावान फुटबॉलर शोधून काढण्यासाठी टीव्ही 9 नेटवर्कने ‘इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस’ ही मोहिम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गंत असंख्य खेळाडूंनी फुटबॉल स्पर्धेत सहभाग घेतला. काही हजारो खेळाडूंमधून दिल्लीच्या अनिरुद्ध खंडुरी याची ऑस्ट्रिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. आपल्या मुलाची प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने खंडुरी कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
‘इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस’ या मोहिमेत असंख्य शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस’ मोहिमेअंतर्गत एकूण 8 स्काउटिंग कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 16 हजार शाळांमधून 50 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. या 50 हजार विद्यार्थ्यांमधून 3 हजार मुली आणि 7 हजार मुलांची नावं अंतिम करण्यात आली. त्यानंतर अनेक सामने खेळवण्यात आले. त्यामधून फक्त 32 जणांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. त्या 32 जणांमध्ये अनिरुद्ध खंडुरी याने स्थान मिळवलं.
अनिरुद्धचं लहानपणापासूनच फुटबॉलर होण्याचं स्वप्न होतं. टीव्ही 9 नेटवर्कच्या मोहिमेमुळे अनिरुद्धच्या या स्वप्नाला पंख मिळाले आहेत. दिग्गज फुटबॉलर लिओनेल मेस्सी अनिरुद्धचा आदर्श. आपल्यालाही त्याच्यासारखंच स्टार फुटबॉलर व्हायचंय, असा अनिरुद्धचा दृढनिश्चय. अनिरुद्धने फक्त हे स्वप्नचं पाहिलं नाही तर त्यासाठी मेहनत घेतली. टीव्ही 9 नेटवर्कच्या मोहिमेमुळे आता अनिरुद्धला व्यासपीठ मिळालं. त्याने याद्वारे आपल्यातील कला दाखवून दिली. आता तो ऑस्ट्रिया दौऱ्यात दिग्गजांकडून प्रशिक्षण घेण्यासाठी उत्सूक आहे.
अनिरुद्धला या दौऱ्यात युरोपियन फुटबॉलच्या सर्वोत्तम प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण मिळणार आहे. अनिरुद्धला नवीन तंत्र आत्मसात करता येणार आहे. या दौऱ्यानिमित्ताने अनिरुद्धची अनेकांसह ओळख होईल. अनिरुद्धसाठी हा दौरा एक फुटबॉलर म्हणून महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे अनिरुद्धच्या कामगिरीकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.
