Paralympic 2024 : प्रीति पालने रचला इतिहास, 100 मीटर शर्यतीत देशासाठी जिंकलं पहिलं पदक
पॅरालिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या पारड्यात तिसरं मेडल पडलं आहे. अवनी लेखरा, मोना अग्रवालनंतर प्रीति पालने इतिहास रचला आहे. भारताला 100 मीटर टी35 कॅटेगरीत कांस्य पदक मिळवून दिलं आहे. अशी कामगिरी करणारी ती देशातील पहिली खेळाडू ठरली आहे.

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. अवनी लेखरा आणि मोना अग्रवालनंतर तिसरं पदक भारताला मिळालं आहे. प्रीति पालने पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करत पदक मिळवलं आहे. प्रीतिने 100 मीटर टी35 कॅटेगरीत भारताला पदक मिळवून दिलं आहे. त्यामुळे प्रीति पालच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. कारण अद्याप ट्रॅक इव्हेंटमध्ये ऑलिम्पिक असो की पॅरालिम्पिक स्पर्धा कोणीही पदक मिळवलेलं नाही. त्यामुळे प्रीति पाल ही ट्रॅक इव्हेंटमध्ये पदक मिळवणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. या स्पर्धेत प्रीतिने आपला स्वत:चा विक्रमही मोडीत काढला आहे. 14.21 सेकंदाच ही शर्यत पूर्ण केली. प्रीति पाल सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. सहाव्या इंडियन ओपन पॅरा एथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतही दोन गोल्ड मेडल मिळवले होते.
जापानमध्ये मे 2024 मध्ये पार पडलेल्या वर्ल्ड पॅरा एथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतही कांस्य पदक मिळवलं होतं. हे मेडल तिने टी35 200 मीटर स्पर्धेत मिळवलं होतं. या पदकासह तिने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत जागा मिळवली होती. तिने या संधीचं सोनं केलं आणि देशाला ट्रॅक अँड फिल्डमध्ये पहिलं मेडल मिळवून दिलं.
Preeti Pal wins third medal for India. 1st medal for India in Paralympics track history. Preeti Pal creates new PB of 14.21 in 100m T35.#Paralympics2024 pic.twitter.com/ZhyaQh8UbM
— Paralympics 2024 Updates (@Badminton7799) August 30, 2024
22 वर्षीय प्रीति पॉलचा जन्म मेरठमध्ये झाला आहे. तिला लहानपणीच सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रासलं होतं. उपचार करूनही त्यावर मात करता आली नाही. पण तिने हार मानली नाही. प्रीतिने दिल्लीत कोच गजेंद्र सिंहच्या देखरेखीत प्रशिक्षण घेतलं आणि आता पदक मिळवून नावलौकिक मिळवला आहे. दरम्यान हे भारताचं पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेतील तिसरं पदक आहे. या आधी नेमबाजीत अवनी लेखराने सुवर्ण तर, मोना अग्रवालने कांस्य पदक जिंकलं आहे.
