Commonwealth Games 2026 : नवऱ्यानं मारलं, निर्वस्त्र घराबाहेर काढलं, आज तीच शर्मिला ‘गोल्ड मेडलिस्ट’; संघर्ष वाचून सलाम ठोकाल!
कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेत महिलांच्य एफ57 शॉटपुट (गोळाफेक) स्पर्धेत शर्मिला धनखडने सुवर्ण पदक पटकावून भारताची मान गौरवाने उंचावली. पण तिचा इथपर्यंचा प्रवास काही सोपा नव्हता. कारण वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओमुळे दिव्यांगत्व आलं होतं. लग्न झाल्यानंतरही संघर्ष काही कमी झाला, उलट पदरी आणखी वेदना पडल्या. त्यांच्या आयुष्यात काय घडलं? याबाबत पॅरा अॅथलिट्स शर्मिला धनखडने स्वत:च खुलासा केला.

ग्लासगो 2026 कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत भारताने एकूण 39 पदकं पटकावून गुणतालिकेत चौथं स्थान पटकावलं. यात भारताने 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांची कमाई केली. या सुवर्ण पदकात एक पदक होतं पॅरा अॅथलिट्स शर्मिला धनखड यांचं.. महिलांच्या एफ 57 शॉटपुट (गोळाफेक) स्पर्धेत 9.81 मीटर लांब गोळा फेकून शर्मिया यांनी सुवर्ण पदक पटकावलं होतं. या कामगिरीमुळे भारताने पॅरा अॅथलेटिक्समध्ये तब्बल 20 वर्षांनी पहिलं सुवर्ण पदक पटकावत प्रतीक्षा संपुष्टात आणली होती. शर्मिला धनखड यांच्या या कामगिरीने साऱ्या देशाची मान अभिमानाने उंचावली आणि त्यांचं कौतुक सुरू झालं. पण यशापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. लहानपणी पोलिओ झाल्याने शर्मिला 40 टक्के दिव्यांग झाल्या होत्या. त्यात 2012 मध्ये घरगुती हिंसेच्या घटनेनंतर आपल्या दोन मुलींसह घराबाहेर पडणं भाग पडलं. त्यातून सावरून त्यांनी नव्या आयुष्याला सुरूवात केली आणि देदीप्यमान यश संपादन केलं.
सुवर्णपदक विजेत्या शर्मिला धनखड यांची संघर्षमय कथा
शर्मिला धनखड यांचा जन्म 15 ऑगस्ट 1986 रोजी हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील छितरौली गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. वडील शेतकरी होते आणि आई पूर्णपणे दृष्टीहीन होती. त्यामुळे आईने शर्मिला यांना कधी पाहिलंच नाही. घरातील बिकट स्थितीमुळे वयाच्या 19व्या वर्षी शर्मिला यांचं कुटुंबियांनी लग्न लावून दिलं. पण सासरच्या लोकांना त्यांचा प्रचंड छळ केला. दोन मुलींची आई झाल्यानंतरही हा छळ काही थांबला नाही. दारूड्या पती त्यांना वारंवार मारहाण करून शिवीगाळ करायचा. एकदा तर मारहाण करून विवस्त्र केलं आणि घरातून हाकलून दिलं. हा प्रसंग सांगताना शर्मिला धनखड यांच्या डोळ्यात आजही पाणी येतं.
शर्मिला धनखड म्हणाल्या की, ‘एक रात्री माझा पती दारू पिऊन घरी आला. मी विचारले, ‘जेवण वाढू का?’ तर तो चिडून म्हणाला, ‘आज मी तुझ्या हाताचं जेवण खाणार नाही.’ माझी मुलगी जवळच झोपली होती. अचानक तो तिच्याजवळ गेला, तिचा पाय पकडला आणि तिला जमिनीवर आपटले. ती रडू लागल्याने थपडा मारू लागला. मी त्याला ढकलून मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. एवढ्याशा कारणावरून तो माझ्यावर धावून आला. त्याने मला शिवीगाळ केली, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. माझी ओढणी ओढली आणि माझे कपडे फाडून टाकले. इतकंच काय तर त्याने मला घरातून फरफटत बाहेर काढले.’
शर्मिला धनखड यांना आजही तो प्रसंग सांगताना भरून येतं. शर्मिला म्हणाल्या की, ‘घरातील मारहाणीचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जागे झाले होते, पण मला अशा विवस्त्र अवस्थेत पाहून सर्वांनी आपल्या नजरा फिरवल्या. माझ्या मुली मला वाचवण्यासाठी आल्या, पण त्याने त्यांनाही बाजूला ढकलून दिले. तितक्यात शेजारी राहणारी एक महिला धावत आली आणि तिने माझ्या अंगावर चादर पांघरली.’ या प्रकारनंतर शर्मिला माहेरी आल्या आणि मुलींचा सांभाळ करण्यासाठी आया म्हणून काम करू लागल्या.
असं बदललं शर्मिला धनखड यांचं आयुष्य
वयाच्या 28 व्या वर्षी अजित सिंग यांच्यासोबत त्यांचा दुसरा विवाह झाला. इतकंच काय तर अजित सिंग यांनी त्यांचा दोन मुलींसह स्वीकार केला. त्यानंतर पॅरा गेम्सबद्दल त्याने एका वृत्तपत्रात वाचलं आणि या खेळात उतरण्याची प्रेरणा शर्मिला यांना दिली. शर्मिलाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ट्रेनिंगचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी राहतं घर विकलं. संपूर्ण कुटुंब भाड्याच्या घरात राहिलं पण सरावात खंड पडू दिला नाही. शेवटी त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं. ग्लासगो 2026 कॉमनवेल्थ स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक पटकावलं. एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे त्यांचं जीवन राहिलं आहे.