PAK vs WI : 35 वर्षानंतर मायदेशात पाकिस्तानची लाज निघाली, वेस्ट इंडिजची टीम मुल्तानची सुल्तान

PAK vs WI : 1990 नंतर पाकिस्तानी भूमीवर वेस्ट इंडिजला मिळालेला हा पहिला कसोटी विजय आहे. मुल्तानच सुल्तान बनून वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा त्यांच्याच घरात 35 वर्षांनी लाजिरवाणा पराभव केला आहे.

PAK vs WI : 35 वर्षानंतर मायदेशात पाकिस्तानची लाज निघाली, वेस्ट इंडिजची टीम  मुल्तानची सुल्तान
West indies won multan test
Image Credit source: Daniel Prentice-Gallo Images/Getty Images
| Updated on: Jan 27, 2025 | 12:31 PM

वेस्ट इंडिजने मुल्तानमधील दुसरा कसोटी सामना जिंकला आहे. या टेस्ट मॅचमध्ये कॅरेबियाई टीमने पाकिस्तानवर 120 धावांच्या मोठ्या फरकाने मात केली. वेस्ट इंडिजने पाकिस्तानला फक्त कसोटी सामन्यातच हरवलेलं नाही, तर मालिका जिंकण्याच्या त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं आहे. मुल्तानच सुल्तान बनून वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा त्यांच्याच घरात 35 वर्षांनी लाजिरवाणा पराभव केला आहे. 1990 नंतर पाकिस्तानी भूमीवर वेस्ट इंडिजला मिळालेला हा पहिला कसोटी विजय आहे.

वेस्ट इंडिजने पाकिस्तान टीमसमोर मुल्तानमध्ये विजयासाठी 254 धावांच टार्गेट ठेवलं होतं. पण आपला देश, आपल्या मनासारखा पीच असूनही पाकिस्तानी टीमने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. पाकिस्तानी टीमची हालत इतकी खराब झाली की, टार्गेट चेस करणं दूर राहिलं, ते 200 धावा सुद्धा करु शकले नाहीत. 254 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतना पाकिस्तानी टीमचा दुसरा डाव फक्त 133 धावांवर आटोपला.

पहिल्या डावात वेस्ट इंडिजच्या फक्त इतक्या धावा

दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पहिल्या इनिंगमध्ये वेस्ट इंडिज टीमला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांचा डाव अवघ्या 163 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात पाकिस्तान टीमचा डावही स्वस्तात आटोपला. त्यांनी 154 धावा केल्या. पहिल्या डावात वेस्ट इंडिजला फक्त 9 धावांची आघाडी मिळाली. वेस्ट इंडिजच्या टीमने दुसऱ्या डावात 244 धावा केल्या. पहिल्या डावातील नाममात्र आघाडीच्या जोरावर त्यांनी पाकिस्तानसमोर विजयासाठी 254 धावांच टार्गेट ठेवलं होतं.

वेस्ट इंडिजचा कुठला गोलंदाज पाकिस्तानसाठी कर्दनकाळ ठरला?

मायदेशात खेळत असूनही पाकिस्तानी टीम दोन्ही इनिंग्समध्ये 200 धावा करु शकली नाही. वेस्ट इंडिजचा जोमेल वारिकन पाकिस्तानसाठी कर्दनकाळ ठरला. त्याने संपूर्ण सामन्यात एकट्याने 9 विकेट घेतले. पहिल्या इनिंगमध्ये 4 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये पाच विकेट काढले. त्याशिवाय पहिल्या इनिंगमध्ये त्याने केलेल्या 36 धावांच्या खेळीकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. या प्रदर्शनासाठी त्याची ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारासाठी निवड झाली.


पहिला कसोटी सामना कोण जिंकलेलं?

वेस्ट इंडिज-पाकिस्तानने दोन्ही टेस्ट मॅच मुल्तानमध्येच खेळल्या. पहिली टेस्ट मॅच पाकिस्तानने 127 धावांनी जिंकली होती. दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजने 120 धावांनी विजय मिळवला. दोन टेस्ट मॅचची ही सीरीज 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे.