ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून ‘हिटमॅन’ला वगळण्याचे कारण रवी शास्त्रींनी उलगडले

| Updated on: Nov 01, 2020 | 8:02 PM

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहितला दौऱ्यातून वगळण्याचे संभाव्य कारण सांगितले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून हिटमॅनला वगळण्याचे कारण रवी शास्त्रींनी उलगडले
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ अर्थात सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्याने चाहते नाराज आहेत. रोहितच्या दुखापतीमुळे हळहळ व्यक्त केली जात असून त्याच्या पुनरागमनाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहितला दौऱ्यातून वगळण्याचे संभाव्य कारण सांगितले. (Ravi Shastri Comment On Rohit Sharma Absence In Australia Tour)

रोहितच्या प्रकृतीवर बीसीसीआय देखरेख करत आहे. रोहितच्या वैद्यकीय अहवालानुसार, त्याने घाई गडबडीत मैदानावर पुनरागमनाचा निर्णय घेतला, तर त्याची दुखापत वाढेल, असे रवी शास्त्री म्हणाले. संघाच्या निवडीत प्रशिक्षकांचे मत विचारात घेतले जात नाही, तो निर्णय सर्वस्वी सिलेक्टर्सचा असतो, याकडेही शास्त्रींनी लक्ष वेधले.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा गुडघ्याचे स्नायू दुखावल्याने आयपीएलमधील मागील चार सामने खेळलेला नाही. रोहितच्या अनुपस्थितीत मुंबई इडियन्सचा विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड सध्या संघाचं नेतृत्व करत आहे.

दुसरीकडे निवड समितीच्या प्रोटॉकॉलमुळे रोहित शर्माची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नाही, असे सध्या सांगण्यात येतेय. रोहित शर्मा सध्या दुखापतग्रस्त आहे. खेळाडू दुखापतग्रस्त असताना संघनिवड करण्यात आल्यास संबंधित खेळाडुचा त्या दौऱ्यासाठी विचार केला जात नाही, असा नियम आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबपासून होणार आहे. एवढ्या वेळेत रोहित शर्मा तंदरुस्त होऊ शकत नाही का, असा सवाल निर्माण झाला आहे. याचा अर्थ रोहित शर्मा याची सध्याची दुखापत गंभीर असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रोहित दुखापतीतून सावरतोय- कायरन पोलार्ड

रोहितच्या कमबॅकबाबत पोलार्ड म्हणाला की, रोहित त्याच्या दुखापतीमधून सावरतोय, लवकरच तो संघात कमबॅक करेल. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतर पोलार्ड समलोचकांशी बोलत होता. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यादरम्यान रोहितच्या डाव्या पायाचे स्नायू दुखावले गेले होते. त्यातूनत रोहित आता सावरतोय.

मुंबई इंडियन्समधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्याद्वारे संघात पुनरागमन करण्याची तयारी करत होता. परंतु त्यापूर्वीच संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. तसेच आयपीएलमध्ये उरलेल्या सर्व सामन्यांचे निकाल कसेही लागले तरी मुंबई इंडियन्स हा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर कायम राहणार आहे. त्यामुळे मुंबईच्या संघासाठी हैदराबादविरुद्धचा सामना फार महत्त्वाचा नाही. त्यामुळे रोहित या सामन्यादरम्यानही आराम करेल. त्यानंतर रोहित थेट क्वालिफायर सामन्यात संघात पुनरागमन करु शकतो.

रोहितवरील उपचार आणि त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून असलेल्या एका सुत्राने गोपनियतेच्या अटीवर सांगितले की, रोहित प्ले ऑफमधील सामने खेळण्याची अधिक शक्यता आहे. संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम राहणार असल्याने रोहितला दुखापतीमधून सावरण्यासाठी आणि फिट होण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.

(Ravi Shastri Comment On Rohit Sharma Absence In Australia Tour)

संबंधित बातम्या

IPL 2020 : रोहित शर्माच्या कमबॅकबाबत कायरन पोलार्डचं मोठं वक्तव्य

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर