
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव करून आरसीबीने १८ वर्षांनंतर पहिल्यांदाच आयपीएलची ट्रॉफी जिंकली. आरसीबीच्या या विजयाचा जल्लोष बंगळुरूसह संपू्र्ण कर्नाटकात साजरा केला गेला. अशातच कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अवाराडी गावात एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. आरसीबीचा विजय साजरा करताना एका चाहत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
बेळगावमध्ये चाहत्याचा मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलमध्ये ट्रॉफी जिंकल्यानंतर बेळगाव जिल्ह्यात जल्लोषाचे वातावरण होते. मुदलागी तालुक्यातील अवाराडी गावातही चाहते आनंद साजरा करत होते. यावेळी काही लोक डान्स करत होते, यावेळी नाचत असताना एका चाहत्याला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मंजुनाथ कुंभार (२५) असे मृत्यूमुखी पडलेल्या चाहत्याचे नाव आहे. मंजुनाथ नाचताना बेशुद्ध पडला आणि काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाला.
शिवामोगा येथेही चाहत्याचा मृत्यू
कर्नाटकमधील शिवमोगा येथे आरसीबीच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला जात होता. या जल्लोषादरम्यान झालेल्या अपघातात एका आरसीबीच्या चाहत्याचा मृत्यू झाला आहे. चाहते जल्लोष करत असताना दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडक झाली, यात एका जयनगर पोलिस स्टेशन हद्दीतील एका चाहत्याला आपला जीव गमवावा लागला.
आरसीबीने पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली
आरसीबीने आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंजाब किंग्सवर 6 धावांनी विजय मिळवला. याआधी आरसीबीने तीनदा अंतिम फेरी गाठली होती, मात्र संघ विजय मिळवू शकला नव्हता. मात्र चौथ्यांदा रजत पाटीदारच्या नेतृत्वात संघाने जेतेपद पटकावले. संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली निवृत्त होण्यापूर्वी संघाने ट्रॉफी जिंकावी ही चाहत्यांची इच्छा होती. ही इच्छा अखेर पूर्ण झाली आहे.