Shubman Gill : शुबमन गिलसोबत दगा झाला का? टीम मधल्याच दोन माणसांनी….वर्ल्ड कप टीम सिलेक्शनवर सनसनाटी खुलासा
Shubman Gill : टीम इंडियाचं टी 20 वर्ल्ड कपसाठी काल सिलेक्शन झालं. यात एक निर्णय अनेकांसाठी धक्कादायक आहे. भारताच्या वनडे आणि टेस्ट टीमचा कॅप्टन शुबमन गिलला वर्ल्ड कप टीममधून वगळणं. आता टीम सिलेक्शनची इनसाइड स्टोरी समोर आली आहे.

काल टीम इंडियाचं टी 20 वर्ल्ड कपसाठी सिलेक्शन झालं. बीसीसीआयच्या निवड समितीने एक हैराण करणारा निर्णय घेतला. त्यांनी भारताच्या वनडे आणि टेस्ट टीमचा कॅप्टन शुबमन गिलची टी 20 वर्ल्ड कप संघात निवड केली नाही. शुबमन गिल टी 20 मध्ये भारताचा उपकर्णधार होता. सलग तीन सामन्यात त्याने ओपनिंग सुद्धा केली. शुबमन गिलला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी शॉकिंग आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीजमधील अखेरचा सामना झाल्यानंतर वर्ल्ड कपसाठी भारतीय स्क्वाडची घोषणा करण्यात आली. शुबमन गिलला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय काही जणांना योग्य सुद्धा वाटतो. आता या निर्णयाबद्दल एक खुलासा झाला आहे. टीम मॅनेजमेंटने दोन दिवस हा निर्णय लपवून ठेवला.
शुक्रवारी 19 डिसेंबरला अहमदाबाद येथे भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये टी 20 सीरीजचा शेवटचा सामना झाला. पायाला दुखापत झाल्यामुळे गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. त्याच्याजागी संजू सॅमसनचा टीममध्ये समावेश करण्यात आला. सॅमसनने फक्त 22 चेंडूत 37 धावा फटकावल्या. सीरीजच्या 3 सामन्यात मिळून गिलने 32 धावा केल्या होत्या. त्यापेक्षा संजूने एकाच सामन्यात जास्त धावा केल्या. शनिवारी स्क्वाडची घोषणा झाली. त्यावेळी गिलचं नाव त्यात नव्हतं. संजूला पुन्हा ओपनिंग पोजिशन मिळणार आहे.
जास्त धक्कादायक काय?
वरवर हा निर्णय योग्य वाटतो. पण आशिया कप दरम्यान अचानक गिलला टीमचं उप कर्णधार बनवण्यात आलं. सॅमसनच्या जागी ओपनिंगला उतरवण्यात आलं. सलग तीन सीरीजमध्ये सपोर्ट केलं. पण अचानक, वर्ल्ड कप आधी टीममधून डच्चू दिला. हा चक्रावून सोडणारा निर्णय आहे. पण त्यापेक्षाही जास्त मोठा धक्का गिलसाठी हा आहे की, शुबमन गिलचा वर्ल्ड कपच्या स्क्वाडमध्ये समावेश करायचा नाही हा निर्णय 48 तास आधीच झाला होता. पण सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर यांनी ही बाब त्याच्यापासून लपवून ठेवली. महत्वाचं म्हणजे गिल शेवटच्या टी 20 सामन्यापर्यंत टीम सोबतच होता.
पण त्याला सांगण्यात आलं नाही
लखनऊमध्ये चौथा टी 20 सामना रद्द झाला. पण त्याआधीच गिलच्या पायाला दुखापत झाली होती.पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, टीम मॅनेजमेंट आणि सिलेक्शन कमिटीने गिलचा वर्ल्ड कप टीममध्ये समावेश करायचा नाही हे आधीच ठरवलं होतं. पण त्यावेळी कॅप्टन आणि कोच दोघांपैकी कोणीही गिलला या बद्दल सांगितलं नाही. गिलची दुखापत इतकी गंभीर नव्हती. पाचव्या अखेरच्या सामन्यात पेनकिलर इंजेक्शन घेऊन तो खेळायला तयार होता. पण त्याला बाहेर ठेवण्याचा निर्णय झाला. वर्ल्ड कप टीममध्ये गिलचा समावेश करायचा नाही हेच कारण त्यामागे होतं. पण त्याला सांगण्यात आलं नाही.
