सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्स जिंकून इतिहास रचला

सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्स जिंकून इतिहास रचला

मुंबई : भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्सचा किताब आपल्या नावे केला आहे. सिंधूने 2017 ची विश्व विजेती नोजोमी ओकुहारा हिला अंतिम सामन्यात पराभूत करत एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. रविवारी झालेल्या या महिला एकेरी अंतिम सामन्यात सिंधूने जपानच्या नोजोमी ओकुहाराचा 21-19, 21-17 ने पराभव केला. मागील वर्षीच्या वर्ल्ड टूर अंतिम सामन्यात ओकुहाराने सिंधूचा पराभव केला होता, मात्र यावेळी सिंधू तिच्या वरचढ ठरली. त्यासोबतच सिंधू ही वर्ल्ड टूर फायनल्सचा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.

सिंधू सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टूर फायनल्स खेळली. मागील वर्षी ती या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचली, मात्र जपानच्या नोजोमी ओकुहाराने तिला पराभूत केले, त्यामुळे सिंधूला रजत पदकावर समाधान मानावे लागले. मात्र यावेळी सिंधूने शानदार खेळी खेळत हा किताब आपल्या नावे केला.

वर्ल्ड टूर फायनल्सच्या अंतिम सामन्याच्या सुरुवातीला पहिला गुण ओकुहाराने घेतला, पण सिंधूने वापसी करत आघाडी मिळवली. पहिल्या गेम ब्रेकपर्यंत सिंधूने 11-6 पर्यंत आघाडी घेतली होती. ब्रेकनंतर सिंधूने 14-6 ने आघाडी घेतली. मात्र ओकुहाराने पुन्हा वापसी केली आणि 16-16 ने बरोबरी झाली. यानंतर सिंधूने 20-17 ने आघाडी घेतली. ओकुहाराने पुन्ही 2 गुण घेतले. शेवटी सिंधूने आपला जबरदस्त खेळ दाखवत पहिला गेम 21-19 ने जिंकला.

दुसऱ्या गेमच्या सुरुवातीला सिंधूने 3 गुण घेतले. ओकुहाराने या नंतर सिंधूला चांगलीच टक्कर देत 11-9ने आघाडी घेतली. यानंतर सिंधूने 21-17 ने आघाडी घेत हा सामना जिंकला.

याआधी 2011 साली सायना नेहवाल वर्ल्ड सुपर सीरीज फायनल्समध्ये पोहोचली होती, तर 2009 साली ज्वाला गुट्टा आणि वी दीजू यांची जोडी उपविजेता ठरली होती.

Published On - 6:20 pm, Sun, 16 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI