
भारतीय महिला क्रिकेट टीमची उपकर्णधार आणि स्टार फलंदाज स्मृती मानधनाचं लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे. रविवारी 23 नोव्हेंबर रोजी संगीतकार पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना सांगलीत विवाहबंधनात अडकणार होते. परंतु सकाळी न्याहारीच्या वेळी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती बिघडली. त्यांना छातीत दुखू लागल्याने सांगलीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराची लक्षणं होती, अशी माहिती डॉक्टरांनी दिली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. यादरम्यान स्मृतीने मोठं पाऊल उचललं आहे.
जोपर्यंत वडील पूर्णपणे ठीक होत नाहीत, तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय खुद्द स्मृतीने घेतल्याची माहिती तिचे मॅनेजर तोहिन मिश्रा यांनी दिली. त्यामुळे स्मृती आणि पलाशचं लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे. यादरम्यान स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील लग्नाशी संबंधित सर्व फोटो आणि व्हिडीओ काढून टाकले आहेत. स्मृतीने तिच्या टीममधील मैत्रिणींसोबत खास रील पोस्ट केला होता. ‘समझो हो ही गया’ या गाण्यावर डान्स करत तिने या व्हिडीओत साखरपुड्याची अंगठी दाखवली होती. तर पलाशने क्रिकेटच्या मैदानावर स्मृतीला प्रपोज केल्याचा व्हिडीओ पोस्ट केला. स्मृतीने हे सर्व पोस्ट आणि व्हिडीओ काढून टाकले आहेत.
स्मृतीने एका मजेशीर इन्स्टाग्राम रीलच्या माध्यमातून पलाश मुच्छलशी झालेल्या साखरपुड्याची घोषणा केली होती. 2006 मधल्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटातील ‘समझो हो ही गया’ या गाण्यावर ती थिरकली होती. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत जेमिमा रोड्रिग्स, श्रेयांका पाटील, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांनीसुद्धा धमाल अभिनय आणि डान्स केला होता. परंतु हा व्हिडीओ आता स्मृती मानधनाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिसत नाही. तर दुसरीकडे पलाश मुच्छलने लग्नाआधी स्मृतीला मोठा सरप्राइज दिला होता. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये त्याने स्मृतीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. पलाशने 21 नोव्हेंबर रोजी या खास क्षणांचा व्हिडीओ पोस्ट केला होता. पलाशच्या अकाऊंटवर मात्र अजूनही हा व्हिडीओ पहायला मिळतोय.
स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना सांगलीतील सार्व्हित हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णालयाचे संचालक डॉ. नमन शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराची लक्षणं होती. मुलीच्या लग्नात झालेल्या धावपळीमुळे, कामांमुळे त्यांना शारीरिक किंवा मानसिक ताण आला असावा आणि त्यामुळेच हृदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.