स्मृती मानधनाच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा त्रास का झाला? डॉक्टरांनी सांगितलं मोठं कारण

विवाह विधीच्या अवघ्या काही तास आधी वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा विवाहसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. तिच्या वडिलांवर सध्या सांगलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्मृती मानधनाच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा त्रास का झाला? डॉक्टरांनी सांगितलं मोठं कारण
स्मृती मानधना आणि तिचे वडील श्रीनिवास मानधना
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 24, 2025 | 8:09 AM

अक्षतांची वेळ अवघ्या तीन तासांवर आली असताना विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि फलंदाज स्मृती मानधना हिच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणूव लागला. यामुळे रविवारी 23 नोव्हेंबर रोजी चालू असलेला स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह विधी पुढे ढकलण्यात आला आहे. सांगलीतील समडोळी रस्त्यावरील एका फार्म हाऊसवर मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत गेले तीन दिवस लग्न सोहळ्यातील विविध कार्यक्रम सुरू होते.

स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना सांगलीतील सार्व्हित हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णालयाचे संचालक डॉ. नमन शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराची लक्षणं होती. मुलीच्या लग्नात झालेल्या धावपळीमुळे, कामांमुळे त्यांना शारीरिक किंवा मानसिक ताण आला असावा आणि त्यामुळेच हृदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

माध्यमांशी बोलताना डॉ. नमन शाह पुढे म्हणाले, “स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना सकाळी 11.30 च्या सुमारास छातीत डावीकडे दुखू लागलं होतं. ही हृदयविकारासारखीच लक्षणं होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांना सार्व्हित हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या हृदयातील एन्झाइम्स किंचित वाढले असले तरी त्यांना सतत निरीक्षणाची आवश्यकता आहे. आमचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रोहन ठाणेदार यांनीही त्यांची तपासणी केली आहे. इकोकार्डिओग्रामवर कोणतेही नवीन निष्कर्ष नाहीत. परंतु त्यांना सतत ईसीजी देखरेखीची आणि आवश्यक असल्यास अँजिओग्राफीची गरज असू शकते. सध्या त्यांचा रक्तदाब थोडा वाढला आहे. म्हणून त्यांना सतत देखरेखीची आवश्यकता आहे. हे शारीरिक आणि मानसिक ताणामुळे असू शकतं.”

शुक्रवारी नवऱ्या मुलाचं स्वागत झाल्यानंतर शनिवारी सकाळी हळदीचा कार्यक्रम पार पडला. टीम इंडियातील जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयांका पाटील, शेफाली वर्मा, रेणुका सिंह या स्मृतीच्या खेळाडू मैत्रीणींनीही लग्नातील हळदीच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला. शनिवारी रात्रीच संगीताचा कार्यक्रमही पार पडला. दरम्यान लग्नसोहळा आयोजित करण्यात आलेल्या कंपनीचे व्यवस्थापक तोहीन मिश्रा यांनी माध्यमांसमोर येऊन रविवारचा विवाह विधी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याचं सांगितलं.