
टी-20 वर्ल्डकप 2026 (T20 worldcup) साठी टीम इंडियाची नुकतीच घोषणा करण्यात आली, मात्र यावेळी शुबमन गिल (Shubman Gill) याला त्याच्या खराब फॉर्ममुळे संघात स्थान मिळालं नाही. सिलेक्टर्सनी त्याला थेट बाहेरचा रस्ता दाखवला असून भारतीय संघात आणखीही काही बदल करण्यात आले. सूर्यकुमरा यादव याचे कर्णधारपद शाबूत असून तोही संघात आहे. मात्र याचमुळे अनेक क्रिकेटप्रेमींच्या मनात एक प्रश्न घोळतोय तो म्हणजे खराब फॉर्ममुळे गिलला काढलं, तशीच परिस्थिती सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) असताना त्याला मात्र संघात कायम कसं ठेवण्यात आलं ? आता त्यामागचं कारण स्पष्ट झालं आहे.
खरंतर उत्तर सर्वांनाच माहीत आहे. वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी कोणत्याही संघाच्या कर्णधाराला (टीममधून) कधीच वगळलं जात नाही, त्यांचा फॉर्म खराब असला तरी कॅप्टनला कधीच हटवण्यात येत नाही. सूर्यकुमार यादव हा कॅप्टन असल्याने, त्यासाठीच त्याला 2026च्या भारताच्या टी-20 वर्ल्डकपसाठी कायम ठेवलं असावं असं बोललं जात आहे. तेच एकमेव कारण असू शकतं असा अंदाज व्यक्त होत आहे.
गिलला काढला, सूर्यकुमार यादवचाही फॉर्म खराब
टी-20 संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त झालेला शुभमन गिल याला संघातून बाहेर काढल्यावर बरीच चर्चा झाली, पण तसं बघायला गेलं तर SKY ची (सूर्यकुमार यादव) स्थिती देखील खूपच कमकुवत होती. दोन्ही फलंदाजांची कामगिरी खराब आहे, पण तरीही एकाला बाहेर काढण्यात आलं तर एकाला संघात ठेवून त्याला संधी देण्यात आली. भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार असलेल्या शुबमनल गिल याला टी-20 मधील त्याच्या सरासरी कामगिरीमुळे संघातून वगळण्यात आलं. त्याने 15 डावांमध्ये 291 धावा केल्या, त्याचा स्ट्राईक रेट 137 पेक्षा थोडा जास्त होता, मात्र तो टी20 साठी अपुरा मानला जात होता.
पण सूर्यकुमार यादव याचा रेकॉर्ड तर आणखीनच वाईट आहे. टीम इंडियाचा टी-20 कर्णधार असलेल्या सूर्यकुमार यादवने यावर्षी 19 डावांमध्ये फक्त 218 धावा केल्या, त्याचा स्ट्राईक रेट 23.2 होता, जो त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट फॉर्म होता. तरीही सिलेक्टर्सनी गिलला काढलं, पण सूर्यकुमा यादवला संघात कायम ठेवलं.
SKYला कोणामुळे मिळालं जीवदान ?
PTI च्या रिपोर्टनुसार, कॅप्टन्सीमुळेच सूर्यकुमारला आणखी एक संधी मिळाली, त्याच्या फॉर्ममुळे नव्हे. ‘SKY संघात ठेवण्यात आलं कारण तो कर्णधार आहे, मात्र गिलला टीम इंडियातून वगळावं लागलं कारण त्याची कामगिरी अभिषेक शर्माइतकी प्रभावी नव्हती’ असं अहवालात म्हटलं आहे. म्हणजेच फक्त कर्णधारपदामुळे सूर्यकुमारला थोडा वेळ मिळाला आहे, जास्त काही नाही हे स्पष्ट आहे. पण ही संधी देखील फार काळ टिकणारी नाही. त्याच अहवालात स्पष्टपणे असा इशारा देण्यात आला आहे की गौतम गंभीरच्या संघात, धावा काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. “गंभीरला ओळखणाऱ्या कोणालाही माहीत असेल की, जिंकणं हेच त्याच्यासाठी सर्वकाही आहे. आज गिल संघाबाहेर आहे, उद्या सूर्यकुमार यादवही बाहेर जाऊ शकतो,” असं बोललं जातंय.
याच अहवालात असंही म्हटलं आहे की, गिलला वगळल्यानंतर सिलेक्टर्सनी संजू सॅमसनवर विश्वास दाखवला आणि त्याला संघात कायम ठेवले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात 22 चेंडूत 37 धावा काढून सॅमसनने आपल्या निवडीचे समर्थन केले. सिलेक्टर्सनी स्पष्ट संदेश दिलाय : फक्त नावामुळे या भारतीय संघात कोणीही सुरक्षित नाही, अगदी कर्णधारही नाही.