IPL 2026 : अभिषेक शर्मा पाकिस्तानच्या एका खेळाडूला रोज नुसता कानफटवतोय, पुढच्यावेळी बोलण्याआधी दहावेळा विचार करेल
Abhishek Sharma IPL 2026 : टी20 वर्ल्ड कप सुरु असताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर एका टीव्ही शो मध्ये अभिषेक शर्मा बद्दल नको ते बोललेला. त्यावेळी अभिषेकचाही वाईट फॉर्म सुरु होता. पण आता अभिषेकने त्याची बोलती बंद करुन टाकली आहे.

टी20 वर्ल्ड कप सुरु असताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माच्या खेळाबद्दल एक वक्तव्य केलं होतं. हा मोहम्मद अमीर मॅच फिक्सिंगच्या आरोपांमध्ये दोषी ठरला होता. “अभिषेक शर्माची बॅटिंग चालली तर चालली, नाही तर काही नाही. तो उत्तम फलंदाज नाहीय. हुशारीने गोलंदाजी केल्यास बॉलर त्याच्यावर वरचढ ठरु शकतो” असं मोहम्मद अमीर एका टीव्ही शो मध्ये अभिषेक शर्माबद्दल बोलला होता. त्यावेळी दुर्देवाने अभिषेक शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. संपूर्ण टी20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्माची फलंदाजी चर्चेचा विषय बनली होती. त्याच्या धावा होत नव्हत्या. आक्रमक ओपनर ही त्याची जी ओळख आहे, त्याला अभिषेक शर्मा न्याय देऊ शकत नव्हता.
टी20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्मा दोन महत्वाच्या इनिंग खेळला. एक झिम्बाब्वे विरुद्ध आणि दुसरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. झिम्बाब्वे विरुद्ध सामन्यात नेट रनरेट सुधारण्यासाठी भारताला मोठा विजय आवश्यक होता. त्यावेळी अभिषेकने 30 चेंडूत 55 धावा फटकावल्या. त्यामुळे टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 256 धावांचा डोंगर उभारला. टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील हा दुसरा हायेस्ट स्कोर आहे. भारताने हा सामना जिंकला.
स्लॉगर असा खेळतो का?
फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध महत्वाच्या सामन्यात अभिषेक 21 चेंडूत 52 धावांनी खेळी खेळला. भारताने 255 धावा करुन हा सामना सुद्धा जिंकला. फायनलमध्ये भारताने 96 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. अभिषेक शर्माच्या या दोन इनिंग म्हणजे अमीरच्या तोंडावर चपराक होती. अभिषेक शर्माने मोहम्मद अमीरच्या कानशिलात लगावण्याचा सुरु केलेला हा सिलसिला अजूनही कायम आहे. आता आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना अभिषेक शर्मा जबरदस्त प्रदर्शन करतोय. SRH चे आतापर्यंत सात सामने झालेत. त्यात चार मॅचमध्ये अभिषेकने टॉप परफॉर्मन्स दिलाय. एक सेंच्युरी, दोन फिफ्टी आणि 48 धावांची खेळी. जो स्लॉगर आहे, ज्याच्या बॅटला बॉल लागला तर लागतो तो असा खेळतो का? मोहम्मद अमीरने पुढच्यावेळी बोलण्याआधी दहावेळा विचार करावा.