Sunil Gavaskar : ‘हार्दिकची जागा कोणी घेऊ शकत नाही’, भारतीय गोलंदाजीवर भडकलेल्या सुनील गावस्करांनी दिला एक चांगला सल्ला
Sunil Gavaskar : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील टी20 सीरीज बरोबरीत सुटली. पण या मालिकेने भारतीय गोलंदाजीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भारताची सुमार दर्जाची गोलंदाजी या मालिकेने उघड केली.

Sunil Gavaskar On Team India Bowling : भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये पाच टी20 सामन्यांची सीरीज झाली. या मालिकेत भारतीय गोलंदाज काही खास करु शकले नाहीत. सीरीजच्या निकालानंतर भारतीय टीमच्या गोलंदाजीवर माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. प्लेइंग 11 मध्ये आठ फलंदाज खेळवण्याच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केलाय. जास्त फलंदाज खेळवण्याच्या नादात गोलंदाज कमी होत असल्याने गोलंदाजी कमकुवत होत चालली आहे. वेस्ट इंडिजच्या टीमने संपूर्ण सीरीजमध्ये तीनवेळा 200 पेक्षा जास्त धावांचा आकडा पार केला. दोन सामन्यात 240 पेक्षा जास्त धावा केल्या.
सीरीजच्या बहुतांश सामन्यात टीम मॅनेजमेंटने तीन स्पेशलिस्ट गोलंदाजांना मैदानावर उतरवलं. चौथ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजने 247 धावा केल्या. त्यावेळी भारताकडे मयंक यादव, अर्शदीप सिंह आणि प्रिन्स यादवच्या रुपात तीन स्पेशलिस्ट गोलंदाज होते. अन्य गोलंदाजांचा कोटा भरण्यासाठी ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल आणि नमन धीरवर टीम अवलंबून होती. टीमला याची मोठी किंमत चुकवावी लागली.
गावस्कर काय म्हणाले?
गावस्कर यांनी कुठल्याही परिस्थितीत चार स्पेशलिस्ट गोलंदाजांसह मैदानावर उतरण्याचा सल्ला दिला. “भारताने आपल्या प्लेइंग 11 मध्ये कमीत कमी चार स्पेशलिस्ट गोलंदाज खेळवावेत. पाचवा आणि सहावा पर्याय ऑलराऊंडर असला पाहिजे. जो फलंदाजी सुद्धा करु शकतो. अक्षर पटेल, नमन धीर यांची उदाहरणं दिली. मला असं वाटतं की अनेकदा आपण हार्दिक पंड्याचा पर्याय शोधण्याच्या नादात भरकटतो. हार्दिकची जागा कोणी घेऊ शकत नाही. जर, तुम्हाला त्या कॅलिबरचा ऑलराऊंडर सापडत नसेल तर उपयोगी पडेल असा खेळाडू खेळवा. नमन धीर ते काम करतोय” असं गावस्कर म्हणाले.
श्रेयस अय्यर काय म्हणाला?
सीरीजच्या अखेरच्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने गोलंदाजीवर मोठ स्टेटमेंट केलं. “दुसऱ्या आणि चौथ्या सामन्यात आम्ही चांगली गोलंदाजी केली असती तर निकाल वेगळा असता. त्यांची फलंदाजी कौतुकास्पद होती. शाई होपने संपूर्ण सीरीजमध्ये शानदार फलंदाजी केली”
