तुम्ही काय गौतम गंभीरला…माजी क्रिकेटर जाम भडकला, चांगली खरडपट्टीच काढली; काय घडलं?

दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन सामने भारताने गमावले आहेत. त्यामुळेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीका केली जाते. असे असतनाच आता भारताचा माजी क्रिकेटपटू चांगलाच भडकला आहे.

तुम्ही काय गौतम गंभीरला...माजी क्रिकेटर जाम भडकला, चांगली खरडपट्टीच काढली; काय घडलं?
gautam gambhir
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 27, 2025 | 2:50 PM

Gautam Gambhir : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या टी-20, एकदिवसीय आणि काही कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. सध्या भारताचे दक्षिण आफ्रिकेविरोधात एकूण दोन कसोटी सामने झाले आहेत. हे दोन्ही सामने भारताने गमावले आहेत. दुसऱ्या कसोटी सामन्यात तर भारताचा लाजीरवाणा पराभव झाला आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाने दोन्ही सामने गमावल्यामुळे आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. विशेष म्हणजे भारतीय संघाच्या या अपयशामुळे गंभीर यांना मुदतीआधीच मुख्य प्रशिक्षकपदाची खुर्ची खाली करावी लागणार की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. गंभीर यांच्यावर सध्या चौफेर टीका होत आहे. मात्र माजी क्रिकेटर सुनिल गावस्कर यांनी मात्र गौतम गंभीर यांची पाठराखण केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी गंभीर यांच्यावर टीका करणाऱ्यांना शेलक्या शब्दांत सुनावलं आहे.

विजयाचं श्रेय गौतमला द्यायला तयार नसाल तर…

गौतम गंभीर यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर सध्या काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांची संघनिवड, खेळाडूंना मिळत असलेल प्रशिक्षण यावरही वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहेत. असे असताना आता सुनील गावस्कर यांनी पुढे येत गौतम गंभीर यांची पाठराखण केलीय. एखादा प्रशिक्षक तुम्हाला फक्त प्रशिक्षण देऊ शकतो. तुम्हाला दिशा दाखवू शकतो. मार्गदर्शन करू शकतो. परंतु एकदा मैदानात उतरलं की खेळाडूलाच सगळं काही करानं लागतं, असं मत गावस्कर यांनी व्यक्त केलं. तसेच भारतीय संघाने अलिकडे चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया चषक स्पर्धा जिंकली. या दोन्ही स्पर्धांसाठी भारतीय संघाला गौतम गंभीर यांनीच प्रशिक्षण दिले आहे. पण तुम्ही भारताच्या या दोन्ही विजयासाठी गौतम गंभीर यांना श्रेय देण्यास तयार नसाल तर मग आता त्यांना का जबाबदार धरले जात आहे? असा रोखठोक सवालही गावस्कर यांनी केला.

आताच गौतम गंभीरला जबाबदार का धरलं जातंय?

गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणातच भारताने दोन ट्रॉफीज जिंकल्या तेव्हा तुम्ही गंभीर यांना भारतीय क्रिकेट संघाचे आजीवन मुख्य प्रशिक्षकपद द्या, अशी मागणी केली का? अशी मागणी तुम्ही केली नसेल तर मग त्यांना आता का जबाबदार धरलं जातंय? असाही सवाल गावस्कर यांनी केला आहे.

उर्वरित सामन्यांत नेमकं काय होणार?

भारताने दक्षिण आफ्रिकेविरोधातील दुसरा कसोटी सामना 408 धावांनी गमावला. त्यानंतर आता एकूण तीन कसोटी सामन्यांत दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात 2-0 अशी स्थिती झाली आहे. गौतम गंभीर यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपद असताना भारताने एकदिवसीय सामना आणि टी-20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. परंतु कसोटी सामन्यात भारताला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. भारताचा दक्षिण आफ्रिकेविरोधात आणखी एक सामना होणार आहे. त्यामुळे या तिसऱ्या कसोटी सामन्यात आणि उर्वरित एकदिवसीय, टी-20 सामन्यात नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.