Suryakumar Yadav : आता वेळही सूर्याबरोबर नाही आणि.. सूर्यकुमार यादव इथेच चुकला, टर्निंग पॉइंट ठरणारी संधी गमावली
Suryakumar Yadav : टीम इंडियाच्या T20 कॅप्टन पदावरुन सूर्यकुमार यादवची गच्छंती अटळ आहे. त्याच्या जागी आजच नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा होऊ शकते. सध्या वेळही सूर्यकुमार यादव सोबत नाही आणि इतरही गोष्टी. त्यामुळे सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद जाणं हे जवळपास निश्चित आहे.

टीम इंडियाच्या T20 कॅप्टन पदावरुन सूर्यकुमार यादवला हटवलं जाणार हे जवळपास निश्चित आहे. या बातमीमुळे सूर्याच्या चाहत्यांना थोडं आश्चर्य वाटू शकतं. पण माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट एक्सपर्ट्स या निर्णयामुळे अजिबात हैराण नाहीत. बीसीसीआयची एपेक्स काउंसिल आज होणाऱ्या बैठकीत नव्या टी20 कॅप्टनच्या नावावर शिक्कामोर्तब करेल. निवडकर्ते आणि बीसीसीआय अधिकारी या बद्दल गौतम गंभीरशी बोलतील अशी चर्चा होती. पण बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीरशी सल्ला मसलत केल्याशिवाय हा मोठा निर्णय घेतल्याची माहिती आहे. भारताने 2024 साली टी 20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर टीम इंडिया आतापर्यंत 51 सामने खेळली आहे. त्यात 40 विजय मिळवले आहेत. सात सामने गमावले. दोन टाय झाले आणि दोन सामन्यांचा निकाल लागला नाही.
टीम इंडियाने या काळात प्रत्येक सीरीजमध्ये जबरदस्त कामगिरी केली. या 51 सामन्यात सूर्यकुमार यादवने फक्त 25.27 च्या सरासरीने 935 धावा केल्या. त्याने फक्त सहा अर्धशतकं झळकावली. अन्य खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे त्याआड सूर्यकुमार यादवचं प्रदर्शन लपून गेलं. मागच्यावर्षी 19 सामन्यात सूर्यकुमार यादवची सरासरी 13.62 होती.
पण सूर्या इथे सुद्धा चुकला
भले, सूर्यकुमार यादव व्यक्तिगत पातळीवर अपयशी असला, तरी भारताने मागच्या दोन वर्षात त्याच्या नेतृत्वाखाली 45 पैकी 35 सामने जिंकले. या सामन्यांमध्ये त्याची सरासरी 25 होती. सूर्याची खराब कामगिरी असूनही बीसीसीआयने त्याला कर्णधारपदावर कयाम ठेवलं कारण टी20 वर्ल्ड कप जवळ आलेला. सूर्यासाठी कर्णधार पद टिकवून ठेवण्याची संधी म्हणजे इंडियन प्रीमियर लीग टुर्नामेंट होती. हा त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला असता. पण सूर्या इथे सुद्धा चुकला.
हे सर्व त्याच्या विरोधात जाणारं आहे
सिलेक्टर्सना उत्तर देण्यासाठी आणि चाहत्यांचा विश्वास जिंकण्यासाठी सूर्यकुमार यादवकडे एकूण 14 सामने होते. पण करिअर संकटात असताना सूर्यकुमार यादवने 13 सामन्यात 20.76 च्या सरासरीने 270 धावा केल्या. सूर्या जे शॉट फ्लिक करुन किंवा बॅटिच्या स्पर्शाने सहज सीमापार पोहोचवायचा, त्या चेंडूवर तो सतत आऊट होत होता. छोटी बाऊंड्री असूनही सूर्या कॅचआऊट होत होता. सूर्याची जादू ओसरल्याचे ते संकेत होते. सूर्याची कमकुवत बाजू गोलंदाजांनी अचूकतेने हेरली. त्यामुळे आयपीएलमधल्या प्रत्येक टीमने सूर्याला सहज आऊट केलं. सूर्याची सरासरी, वय हे सर्व त्याच्या विरोधात जाणारं आहे. त्यामुळे बीसीसीआयकडे सुद्धा ऑप्शन राहिलेला नाही.