T20 World Cup : बांगलादेशचा नवा गोंधळ, ICCचं ऐकण्यासही नकार, फायनली खेळणार की नाही ?
ICC T20 World Cup : टी-20 वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात न येण्यावर बांगलादेश क्रिकेट बोर्ड ठाम आहे. आता यावरून एक नवीन वाद निर्माण झाला आहे. 21 जानेवारीपर्यंत यावर अंतिम निर्णय घ्या असं आयसीसीने बांगलादेश बोर्डाला सांगितले होते, मात्र आता बांगलादेशने..

आयसीसी टी-20 वर्ल्डकपवरून (T20 World Cup) सुरू असलेला वाद अजून शांत झालेला नाहीये. फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकात खेळण्यासाठी भारतात न जाण्याचा निर्णय बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) घेतला होता. मात्र यावर बरीच चर्चा झाली. याप्रकरणी अंतिम निर्णय घेण्यासाठी 21 जानेवारीपर्यंत कोणतीही ‘डेडलाइन’ देण्यात आल्याचा दावा बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) फेटाळून लावला आहे. सोमवारी आलेल्या रिपोर्टनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) प्रतिनिधी मंडळाने बांगलादेश दौऱ्यादरम्यान बोर्डाला अल्टिमेटम दिला होता. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अतिम वेळापत्रक स्वीकारावे किंवा क्रमवारीतील पुढील सर्वोत्तम संघ स्कॉटलंडला स्पर्धेत आपले स्थान द्यावेअसे त्यातच म्हटलं होतं.
भारतात येण्यास बांगलादेश बोर्डाचा नकार
बीसीबी आणि आयसीसीमधील हा विषय गेल्या तीन आठवड्यांपासून रखडलेला आहे. “सुरक्षेच्या” चिंतेमुळे बीसीबी हा बांगलादेशचा संघ भारतात पाठवण्यास तयार नाही. हे सर्व बीसीसीआयने मुस्तफिजूर रहमानला कोलकाता नाईट रायडर्स मधून आणि आयपीएलमधून बाहेर काढण्याच्या निर्णयानंतर सुरू झालं आहे. मात्र रहमान किंवा बांगलादेशला भारतात कोणताही धोका असल्याच्या सूचना आयसीसीने फेटाळून लावल्या होत्या. 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेला अवघे काही दिवसच उरले असल्याचा पुनरुच्चार केला. त्यामुळे एवढ्या लवकर शेड्युल किंवा व्हेन्यू बदलणं शक्य नसल्याचं आयीसीसीने सांगितलं.
बीसीबीने स्पष्ट केली भूमिका
आयसीसीच्या बैठकीत बोर्डाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे असं बीसीबीचे संचालक अमजद हुसेन म्हणाले. “आमच्या क्रिकेट बोर्डाच्या शिष्टमंडळासोबत आमची बैठक झाली. तिथे आम्ही विश्वचषकात सहभागाबाबत आमची भूमिका स्पष्टपणे मांडली. आम्ही नियोजित ठिकाणी खेळू शकत नाही असे कळवत आम्ही त्यांच्याकडे पर्यायी ठिकाणाची विनंती केली. त्यांच्या प्रतिनिधीशी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की ते या बाबी आयसीसीला कळवतील आणि नंतर निर्णयाची माहिती देतील असं हुसैन यांनी नमूद केलं. तसेच आयसीसीने आम्हाला विशिष्ट तारीख किंवा एखादी डेड लाइन, अंतिम मुदत दिली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते फक्त आम्हाला पुढली तारीख कळवणार होते, असंही त्यांना सांगितलं.
टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेश संघ भारतात आल्यावर, कोलकाता येथे तीन आणि मुंबईत चौथा गट सामना खेळेल. बीसीबीने आयर्लंडसोबत गट बदलण्याचा सल्ला दिला होता, कारण आयसीसीचे सर्व सामने श्रीलंकेत आहेत, परंतु आयसीसीने हा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे बांगलादेशचा संघ या स्पर्धेत खेलमार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
