
IND vs ENG : केनिंग्टन ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला फक्त 6 धावांनी हरवून रोमहर्षक विजय मिळवला आणि ही कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. या सामन्यात सर्व भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आणि त्यांच्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र ही मॅच जिंकल्यीनंतर जो नजारा दिसला त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. ओव्हल कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू हे थेट इंग्लंडच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले होते. भारताचा दमदार फलंदाज करूण नायर यानेच हा खुलासा केला आणि त्याने त्यामागचं खास कारणही सांगितलं. इंग्लंडच्या ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर दोन्ही संघाचे खेळाडू मोकळेपणे एकमेकांशी बोलताना दिसले.
भारतीय फलंदाज करुण नायरने स्वतः हा मुद्दा मांडला. त्याच्या मते, सामना संपल्यानंतर भारतीय संघाने मोठ्या उत्साहात आनंद साजरा केला नाही, तर सर्वजण विरोधी संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले आणि एकमेकांशी बोलले. नायरच्या मते, “दोन्ही संघांना वाटले की ही मालिका अलिकडच्या काळातील सर्वोत्तम कसोटी मालिकांपैकी एक आहे”. तर इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम म्हणाले की, ही अलिकडच्या काळातील सर्वोत्तम मालिका आहे. एक खेळाडू म्हणून आम्हाला या सामन्याबद्दल फारसे काही समजले नव्हते, परंतु जेव्हा आम्ही या संपूर्ण मालिकेकडे पाहिले तेव्हा आम्हाला असे वाटले की आम्ही बरेच काही साध्य केले आहे.
5 कसोटी सामन्यांच्या मालिकेचा प्रवास
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना लीड्स येथे खेळला गेला. हा सामना इंग्लंडने जिंकला. दुसरा कसोटी सामना भारताने जिंकला तर तिसरा सामना इंग्लंडने जिंकला. दोन्ही संघांमधील चौथी कसोटी अनिर्णित राहिली. यामध्ये दोन्ही संघांनी शानदार कामगिरी केली होती. तर पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना भारताने जिंकला. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी घातक गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजीची लाइनअप पूर्णपणे उद्ध्वस्त केली.
करूण नायरचा परफॉर्मन्स
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये करुण नायरला संधी देण्यात आली होती. मात्र, पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये तो कोणतीही मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. ज्यामुळे त्याला चौथ्या कसोटीतून वगळण्यात आले. मात्र ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे नायरला पाचव्या कसोटीत पुन्हा संधी देण्यात आली आणि त्याने त्या सामन्यात 57 धावांची महत्त्वाची खेळी खेळली. त्याच्या खेळीमुळे भारताने पहिल्या डावात 224 धावा केल्या, ज्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ 247 धावांवर ऑलआउट झाला.
त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने 396 धावांचा मोठा स्कोअर उभारला आणि इंग्लंडला एकूण 374 धावांचे लक्ष्य दिले. शेवटच्या दिवशी यजमान संघाला 4 विकेट शिल्लक असताना 35 धावांची आवश्यकता होती, परंतु मोहम्मद सिराजने घातक गोलंदाजी करत या सामन्यात एकूण 9 विकेट घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. आता ऑक्टोबर महिन्यात टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळताना दिसेल.