
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एका दिग्गज क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड विरुद्ध Ashes सीरीज जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज उस्मान ख्वाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. सिडनीमध्ये होणाऱ्या सीरीजमधील शेवटच्या कसोटी सामन्याआधी ख्वाजाने ही घोषणा केली आहे. अनेक आठवड्यांपासून सुरु असलेलं कन्फ्यूजन त्याने दूर केलं आहे. सिडनीमध्ये रविवारी 4 जानेवारीपासून सीरीजमधील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. निवृत्ती जाहीर करताना ख्वाजाने वर्णद्वेषाचा गंभीर आरोप केला आहे.
आज 2 जानेवारीला ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजाने एका पत्रकार परिषदेत त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. बरोबर 14 वर्षांनी त्याच जागी ख्वाजाचं करिअर संपणार आहे, जिथे 2011 मध्ये त्याने सुरुवात केली होती. 2011 साली जानेवारी महिन्यात इंग्लंड विरुद्ध Ashes सीरीजने ख्वाजाने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. सिडनीमध्येच आपल्या होम ग्राऊंडवर ख्वाजा फर्स्ट क्लास करिअरमधील पहिला सामना खेळला होता. आता इथेच त्याच्या टेस्ट करिअरचा शेवट होणार आहे.
काय आरोप केले?
आपल्या निवृत्तीची घोषणा करताना ख्वाजाने पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियन मिडिया आणि माजी क्रिकेटपटूंबद्दल आपला संताप व्यक्त केला. संपूर्ण करिअरप्रमाणे या सीरीजमध्येही फक्त माझ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं असा आरोप करताना ख्वाजाने वर्णद्वेषाचे संकेत दिले. “मी एक कृष्णवर्णीय क्रिकेटपटू आहे. मला अनेक अर्थांनी वेगळं वाटलं. माझ्यासोबत ज्या पद्धतीचा व्यवहार झाला, ज्या गोष्टी घडल्या. पर्थ टेस्ट दरम्यान माझी पाठ आकडलेली. ते माझ्या हातात नव्हतं. पण ज्या पद्धतीने मिडिया आणि माजी क्रिकेटर्स माझ्यावर तुटून पडले. मी दोन दिवस हे सहन करु शकलो असतो. पण पाच दिवस मला हे सर्व सहन करावं लागलं” असं ख्वाजा म्हणाला.
पण त्यांना अशा पद्धतीने कधी टार्गेट केलं नाही
पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्यात फिल्डिंग करताना पाठदुखीचा त्रास झाला. त्यामुळे तो दोन्ही इनिंगमध्ये बॅटिंग करु शकला नाही. या मॅचआधी तो गोल्फ खेळत होता. म्हणून ख्वाजाबद्दल प्रश्न निर्माण झाले. मला आळशी ठरवण्यात आलं असं ख्वाजा म्हणाला. त्याच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. त्याला स्वत:पुरती विचार करणार असं म्हणण्यात आलं. अन्य खेळाडूंना सुद्धा गोल्फ खेळताना दुखापत झाली आहे. पण त्यांना अशा पद्धतीने कधी टार्गेट केलं नाही असा ख्वाजाचा मुद्दा होता. करिअरच्या सुरुवातीपासूनच मला वेगळ्या वागणुकीचा सामना करावा लागलाय. यात वर्णद्वेषाची झलक दिसते असं ख्वाजा म्हणाला.
इंटरनॅशनल करिअरमध्ये किती धावा?
उस्मान ख्वाजा मूळचा पाकिस्तानी वंशाचा आहे. सध्या तो 39 वर्षांचा आहे. करिअरमध्ये तो 87 कसोटी सामने खेळला. 157 इनिंगमध्ये त्याने 43 च्या सरासरीने 6206 धावा केल्या आहेत. यात 16 सेंच्युरी आणि 28 हाफ सेंच्युरी आहेत. 40 वनडे मॅचमध्ये त्याने 1554 धावा केल्या. यात 2 शतकं आणि 15 अर्धशतकं आहेत. तसच 9 टी 20 सामन्यात त्याने 241 धावा केल्यात. सध्या सुरु असलेल्या Ashes सीरीजमध्ये त्याने 30.60 च्या सरासरीने 5 डावात 153 धावा ठोकल्या. यात एक अर्धशतक आहे.