
Smriti Mandhana : संगीतकार पलाश मुच्छल आणि भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना यांचं 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होतं. लग्नापूर्वीच्या सर्व विधी झाल्या होत्या एवढंच नाही तर, लग्नाची तयारी देखील झाली होती. पण लग्नाच्या काही तास आधी स्मृती हिच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्याची माहिती समोर आली आणि स्मृती हिने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला… त्यानंतर स्मृती हिचे वडील श्रीनिवास मंधाना यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत असून, त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे.
श्रीनिवास मंधाना यांना हार्ट अटॅक येण्यापूर्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुलीच्या लग्नात वडील आनंदाने डान्स करत असल्याचं दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिल्यानंतर असं काही घडेल… कोणालाच वाटलं नव्हतं…
हार्ट अटॅक येण्यापूर्वी श्रीनिवास मंधाना लेकीचे लाड देखील करताना दिसले… शिवाय एका व्हिडीओमध्ये त्यांनी ‘कुडमाई’ गाण्यावर डान्स देखील केला. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये स्मृती हिचे वडील ‘ना रे ना रे’ थिरकताना दिसले… व्हिडीओमध्ये ते स्मृती हिच्यासोबत डान्स देखील करताना दिसत आहेत.
श्रीनिवास मंधाना यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना, सांगलीतील सर्वहित रुग्णालयाचे संचालक डॉ. नमन शाह म्हणाले की, रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांना डाव्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या, त्यानंतर हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे दिसू लागली. त्यामुळे त्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
डॉक्टरांच्या मते, त्यांच्या हृदयातील एंजाइम सामान्यपेक्षा किंचित जास्त होते, त्यामुळे त्यांना बारकाईने निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रोहन ठाणेदार यांनी केलेल्या इकोकार्डियोग्राममध्ये कोणतीही अडचण आढळली नाही. गरज पडल्यास अँजिओग्राफी देखील करावी लागू शकते. त्यांचा रक्तदाब सध्या थोडा वाढला आहे, जो लग्नाच्या घाईमुळे किंवा मानसिक ताणामुळे असू शकतो. स्मृती हिच्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे.