
महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये टीम इंडियाने धमाकेदार सुरूवात केली आहे. पहिल्या मॅचमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवला. तर उद्या म्हणजेच 5 ऑक्टोबरला टीम इंडियाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे होणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला असून खेळाडूंनी कसून तयारी सुरू केली आहे. पण या सामन्यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी, कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये टीम इंडियाच्या सराव सत्रादरम्यान, एक अशी घटना घडली ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशनदरम्यान सापाची एंट्री
श्रीलंकेतील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सराव सत्रादरम्यान एक विचित्र घटना घडली. संपूर्ण संघ प्रॅक्टिसमध्ये बिझी असतानाच, मैदानावर एक साप सरपटताना दिसला. स्थानिक भाषेत या सापाला गरंडिया असं म्हटलं जातं, तो साप स्टेडियमच्या गटारांजवळ आणि स्टँडजवळ दिसला. मात्र, श्रीलंकेतील स्टेडियममध्ये साप दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीदेखील लंका प्रीमियर लीग आणि श्रीलंका-बांगलादेश एकदिवसीय सामन्यादरम्यानही मैदानात साप आला होता.
पण हा साप विषारी नाही आणि तो सामान्यतः उंदरांची शिकार करतो, असे ग्राउंड स्टाफने स्पष्ट केलं. ही एक सामान्य घटना असल्याचे वर्णन करत हा साप कोणासाठीच धोका नसल्याचेही त्यांनी नमूद केलं.भारतीय खेळाडू सेंटर विकेटवरून नेट्सकडे जात असताना त्यांना साप दिसला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कोणीही घाबरलं नाही, उलट सगळे खेळाड उत्सुकतेने साप पहात होते. तेथे उपस्थित असलेले प्रशिक्षक कर्मचारी आणि मीडिया कर्मचारी देखील हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले.
टीम इंडियाचे पाकिस्तानवर वर्चस्व
महिला वर्ल्डकप 2025 दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्यात टीम इंडिया हाच विजयाचा प्रबळ दावेदार आहे. खरं तर, भारतीय महिला संघाने पाकिस्तानविरुद्ध आत्तापर्यंत एकूण 11 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत. अशा परिस्थितीत, टीम इंडिया आणखी एका विजयासह आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर गेल्या आठवड्यात पुरुषांच्या आशिया कप 2025 स्पर्धेदरम्यान दोन्ही देशांमध्ये जोरदार टक्कर झाली. तेव्हाही भारताने पाकिस्तानला हरवलंच.