Deepti Sharma : दीप्तिने ट्रॉफी जिंकून दिली, भावाची छाती अभिमानाने फुगली; म्हणाले आज कुटुंबाला…
भारतीय महिला क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत विश्वचषक जिंकून दाखवला आहे. या कामगिरीत भारताची क्रिकेटपटू दीप्ति शर्मा हिने मोलाची कामगिरी केली आहे. तिच्या याच कामगिरीबद्दल तिच्या भावाने प्रतिक्रिया दिली आहे.

Womens World Cup Final Deepti Sharma : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारत या ट्रॉफीची वाट पाहात होता. दरम्यान, या विजयानंतर भारतीय संघाची सर्वच स्तरातून वाहवा केली जात आहे. भारताच्या विजयात क्रिकेटपटू दीप्ति शर्मा हिने मोलाची कामगिरी केली. भारताचा संघ अडचणीत असताना तिने मोलाची कामगिरी करून दाखवली. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना तिने सळो की पळो करून सोडले. दरम्यान, दीप्तिच्या याच नेत्रदीपक कामगिरीनंतर तिचा भाऊ सुमित शर्मा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी दीप्तिचे तोंडभरून कौतुक केले आहे.
क्रिकेट खेळण्यासाठी दीप्ति करायची हट्ट
सर्वप्रथम मी महिला विश्वचषक टीमला शुभेच्छा देऊ इच्छितो. पूर्ण टूर्नामेंटमध्ये सगळ्यांनी चांगले काम केले. खरं तर दीप्ति शर्मादेखील खूप चांगलं खेळली आहे. कोणत्याही स्पर्धेचा अंतिम सामना खेळताना खूप तणाव असतो. तरादेखील आमची दीप्ति मस्त खेळत राहिली. मी क्रिकेट खेळतो आणि एक कोच देखील होतो. दीप्ति मला तुम्ही खेळायला कुठे जाता? काय करता असं वारंवार विचारायची. माझ्या भावाप्रमाणे मलादेखील क्रिकेट खेळायचं आहे, असं म्हणायची. तिने खूप मेहनत घेतली. सराव केला. आज भारताचा महिला संघ विश्वचषक जिंकला आहे, याचा मला आनंद आहे, अशा भावना सुमित शर्मा यांनी व्यक्त केल्या.
दीप्तिचा आई वडिलांना वाटतोय अभिमान
दीप्ति मुळची आग्रा शहरातील आहे. तेथूनही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, असे सुमित शर्मा यांनी सांगितले. दीप्ति कधी आग्रा शहरात येणार असं विचारलं जात आहे. संपूर्ण आग्रा शहर दीप्तीच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. दीप्तिने देशाचे नाव मोठे केले आहे. आमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. आमचे आई-वडील सगळे बोलत आहेत की आम्हाला मोठा आनंद होत आहे. माझ्या आई-वडिलांनाही दीप्तिचा खूप अभिमान वाटत आहे, असंही सुमित शर्मा यांनी म्हटले आहे.
दीप्ति शर्माने नेमकी काय कामगिरी केली?
दीप्ति शर्माने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खूप मोलाची कामगिरी केली. भारतीय संघ संकटात असताना तिने तिचे कौशल्य पणाला लावून भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात तिने एकूण पाच बळी घेतले. विशेष म्हणजे गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही तिने चांगली कामगिरी करून दाखवली. तिने 58 चेंडूंमध्ये 58 धावा केल्या. याच धावांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेपुढे 298 धावांचा डोंगर उभा केला.
