युवराजचे पाच रेकॉर्ड, जे धोनीलाही करता आले नाहीत!

क्रिकेटसोबत वैयक्तिक आयुष्यातही आजाराशी संघर्ष करुन, सर्व अडथळ्यांवर मात करुन, प्रेरणेचं दुसरं नाव बनलेला युवराज सिंहने मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आपली निवृत्ती जाहीर केली.

युवराजचे पाच रेकॉर्ड, जे धोनीलाही करता आले नाहीत!

Yuvraj Singh | टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंह याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. क्रिकेटसोबत वैयक्तिक आयुष्यातही आजाराशी संघर्ष करुन, सर्व अडथळ्यांवर मात करुन, प्रेरणेचं दुसरं नाव बनलेला युवराज सिंहने मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आपली निवृत्ती जाहीर केली. आजाराशी झुंज देताना कणभर न डगमगलेल्या युवराजचे निवृत्ती जाहीर करताना मात्र डोळे पाणावले.

युवराजने क्रिकेटच्या जगतात स्वत:चं नाव सुवर्णाक्षराने कोरलंच, मात्र देशाचं नावही उज्वल केलं. युवराजने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक विक्रमांची नोंद केली. यावेळी युवराज सिंह आणि महेंद्र सिंह धोनी यांच्या विक्रमांचीही तुलना नेहमीच झाली. मात्र, अनेकदा धोनीलाही युवराजचे विक्रम मोडता आले नाहीत. पाहूया युवराजचे असे पाच रेकॉर्ड, जे धोनीलाही पार करता आले नाहीत :

एका ओव्हरमध्ये 6 सिक्सर : 2007 मध्ये टी-20 विश्वचषक अनेकांना युवराजच्या चौकार-षटकरांमुळे लक्षात राहिला आहे. पाकिस्तानविरोधात पहिला सामना बॉलआऊटने जिंकल्यानंतर, भारताचा दुसरा सामना इंग्लंडविरोधात झाला होता. यावेळी इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिंटऑफसोबत युवराजची बाचाबाची झाली. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 6 सिक्स हाणून, युवराजने सगळ्यांचा भुवया उंचावल्या होत्या. फ्लिंटऑफशी बाचाबाची झाल्याने युवराजने आपला राग खेळातून दाखवला, असे म्हटले जाते. मात्र, त्यावेळी जर फ्लिंटऑफशी धोनीची बाचाबाची झाली असती, तरी ‘कॅप्टन कूल’ धोनीने युवराजसारखी ‘बदला’ घेणारी खेळी केली असती का, याबाबत शंका व्यक्त केली जाते.

मोठ्या सामन्यांचा खेळाडू : आयीसीच्या स्पर्धांमध्ये युवराज सिंह हटके पद्धतीनेच खेळायचा. 2007 चा टी-20 विश्वचषक आणि 2011 चा क्रिकेट विश्वचषकात महेंद्र सिंह धोनी फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. मात्र, युवराजने 2007 आणि 2011 मध्ये धडाकेबाज फलंदाजी करत ‘मॅन ऑफ द मॅच’ किताब मिळवला होता. धोनीला अद्याप अशाप्रकारचा विक्रम नोंदवता आलेला नाही.

आशियाच्या बाहेर शतक : आशियाच्या बाहेर सर्वोत्तम फलंदाजी खूप कमी क्रिकेटर्सना करता आली. यात युवराज सिंहचा समावेश होतो. युवराजने किंग्सस्टनमध्ये विंडीज, झिम्बाब्वेविरोधात हरारेमध्ये आणि ऑस्ट्रेलियाविरोधात सिडनीत शतकं ठोकली होती. महेंद्रसिंह धोनीलाही हे अद्याप शक्य झालेले नाही. दोनवेळा विंडीजविरोधात शतकं ठोकण्यापर्यंत धोनी पोहोचला होता, मात्र त्यावेळी धोनीला शतक ठोकता आलं नाही.

आयसीसी फायनलमधील खेळी : युवराज सिंह जवळपास धोनीच्या वयाइतकाच आहे. मात्र, युवराजने आयसीसी टुर्नामेंट्समध्ये धोनीपेक्षा जास्त आयसीसी फायनल मॅच खेळल्या आहेत. धोनीच्या आधी क्रिकेट करिअर सुरु करणारा युवराज 2002 ची चॅम्पियन ट्रॉफी, 2003 चा विश्वचषक, 2007 चा विश्वचषक, 2014 चा विश्वचषक, 2017 ची चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धांमध्ये फायनलमध्ये खेळला होता. दुसरीकडे, महेंद्रसिंह धोनी केवळ पाच फायनल खेळला आहे.

सर्वात वेगवान टी-20 हाफ सेन्चुरी : ज्या टी-20 सामन्यात युवराजने 6 बॉल 6 सिक्स मारले होते, त्याच सामन्यात सर्वात वेगवान हाफ सेन्चुरी करण्याचा विक्रमही केला होता. 12 चेंडूत 50 धावा करण्याचा विक्रम युवराजने नोंदवला होता. त्यावेळी धोनीही युवराजसोबत मैदानात होता. मात्र, धोनीला युवराजसारखी धडाकेबाज कामगिरी त्यावेळी करता आली नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI